सोलापूर 'लम्पी स्कीन'मुळे मरण पावलेल्या
पशुधनाच्या मालकांना साडेसात कोटींचे अनुदानवाटप
सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीन बाधित जनावरांची संख्या कमी होत असल्याचे चित्र असल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.
या आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात गाय, बैल, वासरे असे एकूण तीन हजार १९१ पशुधन दगावले. त्या पशुधनापोटी पालकांना एकूण सात कोटी ६० लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भास्कर पराडे यांनी यासंबंधीची माहिती दिली. डॉ. पराडे म्हणाले, की लम्पी स्कीन त्वचा आजार केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा आजार आहे.
त्याच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. पशुपालकांनी घाबरून जाऊ नये, यासाठी टोल फ्री क्रमांकावर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच, जिल्ह्यात जनावरांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले. यासाठी जिल्ह्यात १९८ इपिसेंटर उभारण्यात आले. ८ हजार ८७३ बाधित गोठे फवारणी करण्यात आले,
या सर्व उपाययोजनांमुळे जिल्ह्यात लम्पी स्कीनबाधित पशुधनाची संख्या आटोक्यात आली असून, आजरोजी केवळ ५०१ पशुधनावर उपचार सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत ३३ हजार ५२७ गाई, ५ हजार ३९१ बैल असे एकूण ३८ हजार ९१८ पशुधन लम्पी स्कीनने बाधित झाले होते.
त्यापैकी २९ हजार ९५५ गाई, ४ हजार ८५२ बैल असे एकूण ३४ हजार ८०७ पशुधन उपचाराने बरे झाले आहे, अशी माहितीही डॉ. पराडे यांनी दिली.



0 Comments