अबब! कर्नाटक भाजप आमदाराच्या घरातून सहा कोटी जप्त
काही महिन्यानंतर कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. तत्पुर्वीच कर्नाटक भाजपला धक्का देणारी घटना समोर आली आहे.
येथील चन्नागिरी मतदारसंघाचे भाजप आमदार के. मडल विरुपक्षप्पा यांच्या घरातून तब्बल सहा कोटींची रक्कम जप्त केली आहे.ही कारवाई लोकायुक्त पोलिसांनी केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मोठ्या कारवाईमुळे कर्नाटक भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आमदार के. मडल विरुपक्षप्पा यांचा मुलगा व्ही. प्रशांत मडल यास ४० लाखांची लाच घेतना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी आमदार विरुपक्षप्पा यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांची झडती घेतली. त्यावेळी घरी पोलिसांना सहा कोटी रुपये सापडले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या आमदारालाही चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.
लोकायुक्त पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी प्रशांतच्या विरोधात एका व्यक्तीने लाच घेतल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली होती. त्यानुसार लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून प्रशांतला ४० लाखांची लाच घेताना पकडले.
या प्रकरणी एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही त्यांच्या कार्यालयात झडती घेतली. तेथे एक कोटी ७० लाख रुपये सापडले. प्रशांत त्याच्या वडिलांच्या वतीने लाच घेत असल्याचा संशय आहे. त्याच्या कार्यालयात आम्हाला मिळालेल्या पैशाचा स्रोत तपासण्याचे काम सुरू आहे."


0 Comments