न्यायालयाच्या अधिक्षाकालाही लाच घेताना पकडले !
तारीख वाढवून देण्यासाठी लाच मागितलेला न्यायालय सहाय्यक अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला असून लाचखोरी कुठपर्यंत जाऊन पोहोचली आहे याचे हे बोलके उदाहरण आहे.
शासकीय विभागात लाचखोरीचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले असून शासनाचे काही विभाग यात पुढे आहेत. महसूल, पोलीस या विभागातील अधिकारी, कर्मचारी तर सतत लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकत असून कित्येकजण तुरुंगाची हवा खात आहेत.
सतत कारवाया होत असल्या तरी लाचखोरी सुरूच असून सरपंच, ग्रामसेवक आणि कोतवाल देखील या लाचखोरीत अडकताना दिसत आहेत. आता तर न्यायालयाचा अधीक्षक न्यायालयाच्या इमारतीत लाच घेताना सापडला आहे. लाचखोरीतील हा कडेलोट ठरला आहे.
जेथे न्यायदानाचे पवित्र कार्य केले जाते आणि गुन्हेगारांना शिक्षा सुनावली जाते त्याच न्याय मंदिरातील सहाय्यक अधीक्षक न्यायालयाची तारीख वाढवून देण्यासाठी लाचेची मागणी करतो आणि तो रंगेहात सापडतो हे धक्कादायक मानले जाऊ लागले आहे.
जळगाव येथील कौटुंबिक न्यायालयाचा सहाय्यक अधीक्षक असलेला हेमंत बडगुजर हा दोनशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला. विशेष म्हणजे त्याचे वय ५७ असून तो पुढील वर्षी निवृत्त होणार होता पण त्याआधीच तुरुंगात जाऊन बसावे लागले आहे. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीत कौटुंबिक वाद असून हा वाद न्यायालयात पोहोचलेला आहे.
पत्नी नांदायला यावी म्हणून पतीने जळगाव कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. पत्नीनेही त्यांच्या विरोधात पोटगीचा दावा दाखल केला आहे. या दाव्यात न्यायालयाने पत्नीला पोटगी देण्याचा आदेश केलेला आहे.
पत्नीला ८५ हजार रुपये एकरकमी देण्याचा हुकुम न्यायालयाने केलेला असून त्यासाठी तारीख वाढवून देण्याची मागणी तक्रारदाराने केली होती. ही तारीख वाढवून देण्यासाठी न्यायालयाचा अधीक्षक बडगुजर याने दोनशे रुपयांची लाच मागितली.
लाचेची रक्कम देणे मान्य नसलेल्या तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि न्यायालयाच्या अधीक्षकाच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली
आणि यात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या विभागाने सापळा लावला. ठरल्याप्रमाणे न्यायालयाच्या वरच्या मजल्यावरील गोविंदा कॅन्टीनजवळ न्यायालय सहाय्यक अधीक्षक बडगुजर याने तक्रारदार यांच्याकडून दोनशे रुपयांची लाच स्वीकारली.
रक्कम घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडप घालून त्याला रंगेहात पकडले. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बडगुजर याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे न्यायालयाच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शासकीय कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी लाचखोरी करतात आणि कधी पकडलेही जातात, पण जेथे न्यायाचे मंदिर आहे आणि गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते, निरपराधी जनतेला न्याय मिळवून दिला जातो त्याच न्याय मंदिरात लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने जनतेत देखील मोठी चर्चा सुरु झाली आहे.


0 Comments