google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर विठ्ठल मंदिरातच वारकऱ्यांचा मृत्यू !

Breaking News

पंढरपूर विठ्ठल मंदिरातच वारकऱ्यांचा मृत्यू !

 पंढरपूर विठ्ठल मंदिरातच वारकऱ्यांचा मृत्यू !

पंढरपूर माघ यात्रेचा आनंदी सोहळा सुरु असतानाच देवाच्या दारातच एका वारकऱ्याला मृत्यू आला असून माघ एकादशीच्या  निमित्ताने कोल्हापूर येथील वारकरी प्रदक्षिणा घालताना ही घटना घडली आहे. 

वारकरी आणि भाविकांची विठ्ठलावर अपार भक्ती असते आणि देवाच्या दारात अखेरचा श्वास घेणे हे देखील काही भाविक भाग्याचे मानतात. पंढरीच्या विठ्ठल मंदिरात मात्र प्रत्यक्षात अशीच एक घटना समोर आली 

असून कोल्हापूर जिल्ह्यातील एका भाविकाचा मंदिर प्रदक्षिणा घालत असताना मृत्यू ओढवला आहे. माघ यात्रेनिमित्त पंढरीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. एकादशीच्या दिवशी भाविक माघी यात्रेचा आनंदी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करीत होते. 

अवघी  पंढरी भाविकांनी  आणि भक्तीने  फुलून गेलेली होती. याचवेळी मंदिर प्रदक्षिणा घालत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील वारकरी सदाशिव महादेव बारड यांना हृदयविकाराचा धक्का बसला . 

पंचावन्न वर्षे वयाचे विठ्ठल भक्त वारकरी सदाशिव बारड हे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरची पायी वारी करतात. माघ यात्रेसाठी ते २८ जानेवारी रोजीच पंढरीत पोहोचले होते. 

पंढरीत दाखल झाल्यानंतर दर्शन, पूजा, प्रदक्षिणा या त्यांचा नित्यक्रम ठरलेला असायचा. त्यानुसार मंदिराची प्रदक्षिणा घालत असताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि ते जागीच कोसळले. 

 त्यांना तातडीने पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तत्पूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी चक्रेश्वरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.  

Post a Comment

0 Comments