"हा स्वर्गातून बाळासाहेबांनी दिलेला आशीर्वाद" असे सांगत
शहाजीबापू पाटील म्हणाले, "भाजपसोबत जाणं हाच एकमेव.."
“पांडुरंगाच्या पंढरपूर नगरीत आपण असतानाच शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्ही निवडणूक आयोगाकडून आपणास मिळाले याबाबतचा मोठा आनंद आहे. पांडुरंगाने आणि स्वर्गातून हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदे साहेबांना आशीर्वाद दिला.
त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक आनंदी आहे. खरी शिवसेना शिंदे साहेबांची हे आज सत्य ठरले”, अशी पहिली प्रतिक्रिया सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी पंढरपुरात व्यक्त केली.
“संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होणारी टीका म्हणजे सकाळचा पंधरा मिनिटांचा पुढारी आहे. महाराष्ट्र कसा भडकवायचा महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना कसं भडकवायचं असं कुटील कारस्थानी गुण जन्मजात राऊत यांच्याकडे आहेत.
अशी बोचरी टीका यावेळी आमदार शहाजी बापू यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे आणि मातोश्री जरी नसले तरी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांचा आशीर्वाद शिंदे साहेबांसोबत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारासाठी आपला आयुष्य खर्ची घातलं त्यामुळे भाजपसोबत जाणं हाच एकमेव पर्याय होता. त्यामुळे शिंदे साहेबांचा निर्णय योग्य आहे म्हणून बाळासाहेबांच्याच विचाराने आम्ही चालत आहोत”, असेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळाले असल्याचाही आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपण उद्या महाशिवरात्रीला महादेवाच दुग्धाभिषेक करत आनंदोत्सव साजरा करत महाराष्ट्राच्या यश आणि समृद्धीसाठीची प्रार्थना करणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
"सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य तोडून आता असत्यमेव जयते करावे लागेल. खरेदी विक्री कुठपर्यंत गेली आहे. हे आज स्पष्ट झाले. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला. तो पक्ष आणि त्याचे चिन्ह ४० बाजारबुणगे विकत घेतात. याची नोंद इतिहासात राहील.
आज या देशातल्या निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेने गमावला. या देशामधील सर्व स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातलेच हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. न्यायालय, तपास यंत्रणा, निवडणूक आयोग कुणाचे तरी गुलाम असल्यासारखे वाटत आहे.
या निर्णयाला आम्ही नक्कीच आव्हान देऊ. पण ४० बाजारबुणगे पैशांच्या जोरावर बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेऊ शकत असतील तर देशातील जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडून जाईल.", अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.


0 Comments