मोठी बातमी! शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ, राज्य सरकारचा निर्णय
शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी आहे. शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय. सरकारकडून जीआर प्रसिद्ध करून मानधनात वाढ करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.शिक्षण सेवकांच्या मानधनात झालेली वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे.
प्राथमिक आणि उच्च प्राथमिकच्या शिक्षण सेवकांचं मानधन 6 हजार रुपयांवरुन 16 हजार रुपयांवर नेण्यात आलं आहे.
माध्यमिकच्या शिक्षण सेवकांचं वेतन 8 हजार रुपयांवरुन 18 हजार रुपये करण्यात आलं आहे. तर उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक सेवकांचं वेतन नऊ हजार रुपयांवरुन 20 हजार रूपये करण्यात आलं आहे. राज्य शासनाकडून आजच याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.
22 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा आज राज्य सरकारकडून जीआर काढण्यात आला. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी शिक्षक संघटना आणि शिक्षण सेवकांकडून वेळोवेळी मागणी केली जात होती.
या मागणीनुसार लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा मानधन वाढीचा मुद्दा विधिमंडळात चर्चेसाठी घेतला होता. उच्च न्यायालयाने देखील एका निवाड्यात निकाल देताना शिक्षण सेवकांच्या अल्पशा मानधनाविषयी आश्चर्य व्यक्त केले होते. अखेर आज जीआर काढून शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
नऊ वर्षानंतर वाढ
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयात नियुक्त शिक्षकांना 2000 सालापासून पहिली तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून मानधन दिले जाते. त्यानंतर त्यांना शिक्षक म्हणून कायम करून शासन नियमानुसार वेतन दिले जाते. पूर्वीच्या मानधनात सप्टेंबर 20211 मध्ये वाढ करण्यात आली होती.
त्यानुसार सध्या प्राथमिक शिक्षकांना सहा हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना आठ हजार रुपये आणि उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकांना नऊ हजार रुपये मानधन दिले जात होते. गेल्या नऊ वर्षांत शिक्षण सेवकांच्या मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नव्हती.
त्यामुळे आपल्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी शिक्षण सेवक आणि संघटनांकडून करण्यात येत होती. त्यासाठी अनेकवेळा आंदोलने देखील झाली. अखेर यावर डिसेंबर 2022 मध्ये निर्णय आणि आज जीआर काढत मानधन वाढवण्याची घोषणा करण्यात आली.


0 Comments