मोठी बातमी ! औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारची मंजूरी,
शिंदे-फडणवीस सरकारला मोठे यश
महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यास केंद्राची अनुमती असल्याचे म्हटले होते.
तसेच, आता औरंगाबाद शहराचेही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेले हे मोठे यश म्हणावे लागेल.
केंद्र सरकारच्या या निर्णयाची प्रत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. तसेच,
'औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर',
उस्मानाबादचे 'धाराशिव' !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने 'करुन दाखविले'…!'
असेही फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
नामांतराचा संपूर्ण घटनाक्रम…
औरंगाबाद शहर आणि उस्मानाबाद शहर नामांतराचा मुद्दा महाराष्ट्रात मागील 50 वर्षांहून चर्चेत आहे. सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर असा जाहीर सभेत केला होता.
त्यानंतर नामांतराची ही मागणी समोर आली. यासह उस्मानाबादचेही धाराशिव करण्याची मागणी पुढे आली. नामांतराचा हा मुद्दा त्यानंतर मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत कळीचा बनला. शिवसेनेसाठी तर तो प्रमुख अजेंडा राहिला.
त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये दोन्ही शहराच्या नामांतराचा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला.
मात्र, त्यानंतर ठाकरेंचे सरकार पडले आणि सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा निर्णय पुन्हा घेतला. यावेळी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे करण्याचा निर्णय झाला.
दिनांक 16 जुलै 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली. त्यानंतर आज (24 फेब्रुवारी 2023) केंद्र सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करणे याला मंजुरी दिली.
अधिक वाचा -
- कुसवली गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती; शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांनी घेतला विविध योजनांचा लाभ
- मोठी बातमी! माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन


0 Comments