केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. यावेळी पवारांनी अतिशय चाणाक्ष प्रतिक्रिया दिली.
शरद पवार यांची चाणाक्ष प्रतिक्रिया, निवडणूक आयोगाच्या निकालाची हवाच काढली
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाची जणू काही हवाच काढलीय. निवडणूक आयोगाच्या निकालाने फार काही फरक पडणार नाही,
असं शरद पवार म्हणाले आहेत. “हा तर निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्याचा निकाल लागल्यानंतर चर्चा काही करता येत नाही. त्याने फार काही होत नसतं. मला आठवतं काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी आणि इतर हा वाद झाला. त्यावेळी काँग्रेसची बैलजोडी खूण होती.
पण ती बैलजोडी निवडणूक आयोगाच्या निकालाने गेली. पण काँग्रेसने त्यावेळी हात चिन्ह घेतलं. ते चिन्ह लोकांनी मान्य केलं. त्यामुळे त्याचा फार काही फरक पडत नाही. तसंच शिवसेनेच्या बाबतीत लोकं नवं चिन्ह मान्य करतील. ही चर्चा महिनाभर चालेल”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
उद्धव ठाकरेंनी काय-काय भूमिका मांडली?
‘महाराष्ट्रातली जनता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही’
तुम्ही आमच्यावरती कराल त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. याची मला खात्री आहे. ठीक आहे, आजच्या पुरतं तरी त्यांनी धनुष्यबाण चोरलेला आहे. तो धनुष्यबाण कागदावरच आहे. ते चिन्ह आजही माझ्याकडे कायमचे माझ्याकडे राहणार आहे, तो तुम्हाला दाखवतोय एकूण काय की अनेकांना असं वाटलं असेल की आता शिवसेना संपली.
‘हा शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाण’
शिवसेना ही अशी रेसिपी नाहीये. आजपर्यंत पहिल्या दिवसापासून जेव्हा सुद्धा आमच्याकडे एक निशाणी नव्हती हा धनुष्यबाण उल्लेखनी कामगिरी करतो. तसा धनुष्यबाण त्याच्यावरचा कुंकू सुद्धा आपण पाहू शकता.
हा शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यातला आज सुद्धा आमच्या पूजेत असलेल्या धनुष्यबाण आहे आणि याची पूजा ही माननीय शिवसेनाप्रमुखांनी स्वतःच्या हाताने केलेली आहे. या धनुष्यबाणाचा तेज ती जी काय शक्ती आहे त्याला राहणार नाही. याची मला खात्री आहे मला विश्वास आहे
‘असेल रावणाकडे पण धनुष्यबाण’
असेल रावणाकडे पण धनुष्यबाण, पण शेवटी विजय हा जसा रामायणमध्ये रामाचा झाला आणि शंभर कौरव एकत्र आले म्हणून पांडू हरले नव्हते. सत्याचा विजय नेहमी होत आलेला आहे आणि सत्याचाच विजय हा आता आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना बघायला मिळेल.
‘आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणारच’
मी मागे एकदा असं म्हटलं होतं की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. अंध दृत्तराष्ट्र नाहीये तो आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा असं वस्त्रहरण कदापी खपवून घेणार नाही. या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत.
आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा निकाल लागेलच आणि दुसरी जी अपात्रतेची केसही तिथे चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जर घटना मानून निर्णय लागला तर अनेक घटना तज्ज्ञांनी सांगितलेले की निर्णय काय लागणार.


0 Comments