शिपायाने काढला सरपंच, ग्रामसेवकाचा 'काटा' !
उठता बसता सलाम ठोकलेल्या ग्रामपंचायतीच्या शिपायानेच सरपंच आणि ग्रामसेवकाचा असा 'काटा' काढला (Bribe Case) की हुकुम देणारी ही मंडळी थेट तुरुंगात जाऊन बसली आहेत.
लाचखोरीच्या घटना आता केवळ पोलीस, महसूल अथवा अन्य सरकारी विभागातच राहिल्या नसून त्या आता थेट ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचल्या आहेत. आजवर काही सरपंच, ग्रामसेवक एवढेच काय गावाचा कोतवालसुद्धा लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकताना दिसत आहेत.
ग्रामसेवक आणि सरपंच यांना देखील आता लाचेच्या फुकटच्या पैशाची भलतीच गोडी लागली असून त्यातील अनेकजण तुरुंगात जाऊन बसले आहेत. तरीही या मंडळीना लाच अजूनही चवदार लागत आहे.
नुकतेच निफाड तालुक्यातील कोतवालाला लाच घेताना पकडण्यात आले होते तोच आता इगतपुरी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि माजी सरपंच या तिघांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या शिपायानेच त्यांना इंगा दाखवला आहे.
बलायदुरी ग्रामपंचायतीत काम करून आणि सरपंच, ग्रामसेवक यांना सलाम ठोकून कंटाळलेला ग्रामपंचायत शिपाई सेवेतून निवृत्त झाला. या शिपायाची काही रक्कम ग्रामपंचायतीकडून येणे होती परंतु ती त्याला मिळत नव्हती.
१ लाख ६४ हजार ६८२ एवढी मोठी रक्कम असल्याने निवृत्त शिपाई सरपंच, ग्रामसेवक यांचे उंबरठे झिजवत होता. अखेर त्याची ही रक्कम देण्यासाठी सरपंच हिरामण पांडुरंग दुभाषे, ग्रामसेविका आशा देवराम गोडसे, माजी सरपंच मल्हारी पंढरीनाथ गटकळ यांनी तब्बल पन्नास हजार रुपयांची लाच मागितली.
निवृत्त झालेल्या शिपायाची ही हक्काची रक्कम होती परंतु ती देण्यासाठी या तिघांनी शिपायाकडे लाच मागितली. येणारी रक्कम शिपायासाठी मोठी होतीच पण पन्नास हजार रुपयांची लाच देखील त्याच्यासाठी न परवडणारी होती.
आजी माजी सरपंच आणि महिला ग्रामसेवक यांना आता हिसका दाखविण्याचा विचार शिपायाने केला आणि थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. तिघांच्या विरोधात तक्रार देताच एसीबीचे अधिकारी कामाला लागले.
लाचेची पडताळणी केली आणि त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आणि लाच घेताना रंगेहात पकडून तिघांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. ग्रामपंचायत शिपायाची आर्थिक परिस्थिती काय असणार आणि त्याला लाच कशी मागावी एवढा विचार देखील या मंडळीनी केला नाही.
१ लाख ६४ हजाराची हक्काची रक्कम देण्यासाठी त्याच्याकडून तब्बल ५० हजाराची लाच मागण्यात आली होती. त्यामुळे शिपायाने आपला हिसका दाखवत सरपंच, महिला ग्रामसेविका आणि माजी सरपंच यांचा चांगलाच काटा काढला असल्याची चर्चा परिसरात सुरु झाली आहे.


0 Comments