मनात आला संशय आणि तलाठी सुटला पळत ...!
तलाठी भाऊसाहेबांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता तलाठी आपला जीव वाचवत पळत सुटला पण अखेर अधिकाऱ्यांनी त्याला पकडला आणि मुसक्या आवळल्याच ..!
शासकीय विभागातील लाचखोरी काही नवी नाही आणि त्यातून सुटण्यासाठी केली जाणारी धडपड देखील एकापेक्षा एक धमाल असते. पोलीस आणि महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या लाचखोरीच्या घटना सतत उघडकीस येताना दिसतात. आता तर हे लोण ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे. कोतवालसुद्धा लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकू लागला आहे.
तलाठी मंडळीची तर बात काही औरच असते पण अशाच प्रकरणात एका तलाठ्याने जीव आणि नोकरी मुठीत धरून धूम ठोकली पण त्याला पाठलाग करून पकडला आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. लाच घेताना पकडले की पुरावे राहू नयेत म्हणून अनेक लाचखोर काहीतरी युक्त्या करतात.
कुणी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करते तर कुणी लाच घेतलेल्या नोटा तोंडात कोंबून त्या गिळून टाकण्याचा प्रयत्न करते. शिरपूर तालुक्यातील खंबाळे येथील एका तलाठ्याने मात्र आधीच सावधगिरी बाळगली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
तलाठी सुऱ्या पायल्या कोकणी याने शेत जमिनीला वारस लावण्याची कार्यवाही करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांचे वडील मयत झाल्याने जमिनीला वारस लावण्याची कार्यवाही प्रलंबित होती आणि सात बारा उताऱ्यावर नाव लागण्यासाठी ते तलाठ्याकडे हेलपाटे घालत होते. बरेच दिवस त्यांचे हे काम होत नव्हते.
अखेर तलाठी कोकणी याने आवश्यक कागदपत्र आणि सोबत सात हजार रुपये लाचेची मागणी केली. यात तडजोड करीत हा सौदा सहा हजार रुपयावर निश्चित झाला. लाच देणे मान्य नसल्यामुळे तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले आणि संबंधित तलाठी याच्या विरोधात तक्रार दिली.
एसीबी ने या तक्रारीची पडताळणी केली आणि त्यात तलाठ्याने लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडण्यासाठी सापळा लावला.
ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी सहा हजाराची लाच देण्याघेण्याची तयारी झाली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकही त्याला जाळ्यात पकडण्यासाठी सज्ज झाले.
अखेरच्या क्षणी तलाठ्याच्या मनात काही शंका आली. मनात संशयाची पाल चुकाचुकाताच तलाठ्याने आपली चार चाकी गाडी बाहेर काढली आणि गाडीत बसून गाडी सुसाट दामटली. लाचेची रक्कम न स्वीकारताच तलाठी पळू लागला त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक देखील सक्रीय झाले
आणि त्यांनी पळून जाणाऱ्या या तलाठ्याचा पाठलाग सुरु केला. एखाद्या चित्रपटात शोभावा असा प्रसंग प्रत्यक्षात घडत होता. तलाठी आपला जीव आणि नोकरी वाचविण्यासाठी पळत सुटला होता तर लाचखोराला गजाआड करण्यासाठी एसीबीचे पथक त्याच्या मागे धावत सुटले होते.
अखेर हा पाठलाग महामार्गापर्यंत गेला आणि तेथे मात्र या पथकाने तलाठ्याला जेरबंद केले. त्याच्या मुसक्या आवळून त्याला पोलीस ठाण्यात आणले आणि गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेची जिल्हाभर चर्चा रंगली असून तलाठी भाऊसाहेब मात्र तुरुंगात जाऊन बसला आहे.


0 Comments