आदित्य ठाकरेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार?
सध्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व त्याचे पक्षचिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिले आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा भेटत आहे. या निर्णयावर उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत टीका केली आहे.
पक्षाचे नाव आणि चिन्ह ठाकरे यांच्या अडचणीत भर पडली आहे. दरम्यान आता शिंदे गट नवा डाव टाकण्याची शक्यता आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते. कारण विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीप काढल्यास ठाकरे गटाच्या आमदारांना त्यानुसार कार्यवाही करावी लागेल.
इतकेच नव्हे तर त्यांना सरकारच्या बाजूने मतदानही करावे लागेल. या आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे. विधानसभेत विधेयकांवर मतदान होत असताना पक्षाकडून आपल्या आमदारांना व्हीप बजावला जातो.
या व्हीपचे उल्लंघन केल्यास संबंधित आमदार अपात्र ठरू शकतात. अशा आमदारांविरोधक कारवाई करण्याचे अधिकार विधानसभा आणि विधान परिषदेच्या अध्यक्षांना असतात. शिवसेना हे नाव आणि चिन्ह आता शिंदे गटाला मिळाले आहे.
परिणामी त्यांच्याकडून काढण्यात आलेला व्हीप आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील 15 आमदारांसाठी बंधनकारक असणार आहे. शिंदे गटाने काढलेल्या व्हीपचे उल्लंघन केल्यास ठाकरे गटाच्या आमदारावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता ठाकरे गटाकडे फक्त दोन पर्याय आहेत.
पहिला म्हणजे त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावे लागेल. दुसरा पर्याय म्हणजे अनुपस्थित राहण्याचा आहे. मात्र आपण अधिवेशनाला अनुपस्थित राहात असल्याचे त्यांना आधीच कळवावे लागेल व त्याचे सविस्तर कारण द्यावे लागेल. एकूणच आता शिंदे गटाने ठाकरे गटाविरुद्ध मोठी रणनीती आखली आहे.


0 Comments