महिलांनी लक्षणीय प्रगती करीत सगळीच विश्वे व्यापली कौतुकास्पद ! गावाच्या महिला सरपंच बनल्या न्यायाधीश !
सरपंच बनून गावाचा कारभार पाहणाऱ्या महिला सरपंच आता थेट न्यायालयात बसून न्यायदान करणार असून सरपंचपदावरून थेट न्यायाधीशांच्या खुर्चीवर विराजमान होत असलेल्या मोहिनी भागवत यांचे कौतुक होत आहे.
महिलांनी लक्षणीय प्रगती करीत सगळीच विश्वे व्यापली आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीत गुदमरून गेलेली महिला आता पुरुषांच्याही पुढे आणि वेगाने धावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच सगळ्याच क्षेत्रात महिलांचा बोलबाला आहे.
चूल आणि मुल ही संस्कृती महिलांनी आत्मविश्वासाने इतिहास जमा करून टाकली आहे. त्यातच सरपंच पदावरून गावचा कारभार हाकणाऱ्या महिलेला थेट न्यायाधीशपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मळद ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांची प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदावर निवड झाली आहे. या निवडीमुळे सरपंच मोहिनी भागवत यांचे कौतुक होत आहे.
शेतकरी कुटुंबातील मोहिनी भागवत यांनी शिक्षण घेत यशाच्या एकेक पायऱ्या चढत आपली चमक दाखवली होती. नव्या पिढीसमोर एक आदर्शच त्यांनी उभा केला. प्रारंभी वकील झालेल्या मोहिनी भागवत या ग्रामपंचायत सरपंच झाल्या आणि आपल्या कामाचा प्रभाव दाखवत असतानाच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली.
या परीक्षेत त्यांनी यश तर मिळवलेच पण राज्यात पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवले. आता सरपंच पदाच्या खुर्चीवरून त्या थेट न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसणार आहेत आणि न्यायदानाचे पवित्र काम करणार आहेत. त्यांच्या या यशाबद्धल परिसरातून अभिनंदन होत असून त्यांच्या या प्रवासात आणि यशात त्यांचे पती ॲड. बापूराव भागवत यांचीही मोलाची साथ लाभली आहे.


0 Comments