सांगोला तालुक्यातील शेकापच्या ४५ सरपंचांचा शहाजीबापूंवर संताप, कामात खोडा घालत असल्याचा आरोप
“सांगोला तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे शेकापची सत्ता असलेल्या ४५ ग्रामपंचायतींना दुजाभावाची वागणूक देत आहेत.
या ४५ ग्रामपंचायतींनी सादर केलेले विकास कामांचे प्रस्ताव मंजूर न करण्याबाबत अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. ग्रामपंचायतींनी केलेला ठराव ग्राह्य धरला जात नाही. आमदार, खासदार यांची शिफारस आणा असा सल्ला दिला जातो. अधिकारी हे सर्व दबावापोटी करत आहेत.
लोकप्रतिनिधी हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे असल्याचे अधिकाऱ्यांना भासवतात. त्यामुळे अधिकारीही ते म्हणेल तसेच वागतात. हा तालुक्यावरील अन्याय आहे. या प्रकरणी मी उद्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेणार आहे.” अशी माहिती शेकापचे ज्येष्ठ नेते बाबा कारंडे यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे सांगोला तालुक्यातील राजकारण तापू लागले आहे.
तालुक्यातील 45 गावांतील शेतकरी कामगार पक्षाच्या सरपंचानी थेट जिल्हा परिषद गाठली आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला. ते विकास कामात दुजाभाव करीत असल्याची तक्रार थेट जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली.
याप्रकरणी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा कारंडे यांनीही तीव्र शब्दात संताप व्यक्त केला असून या कार्यपद्धतीचा निषेध केला आहे.
या घटनेमुळे सांगोल्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सांगोला तालुक्यात शेकाप आणि आमदार शहाजीबापू पाटील हे पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जातात. विविध कारणांमुळे या दोन्ही गटातील संघर्ष सातत्याने दिसून येतो.
भाई गणपतराव देशमुख यांच्या विरोधात आमदार शहाजी पाटील यांनी अनेकदा निवडणूक लढवून ते सतत पराभूत होत राहिले. असे असले तरी दोन वेळा त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला पराभूत केले आहे.
भाई गणपतराव देशमुख हे हयात असताना त्यांनाही एकदा पराभूत करण्याचा करिश्मा दाखविला. भाई गणपतराव देशमुख यांच्या हयातीतच त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनाही शहाजी पाटील यांनी धूळ चारली आहे.
लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना धमकवतात
या प्रकरणी “थिंक टँक” प्रतिनिधीने शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा कारंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “सांगोला तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे शेकापची सत्ता असलेल्या ४५ ग्रामपंचायतींना दुजाभावाची वागणूक देत आहेत.
या ४५ ग्रामपंचायतींनी सादर केलेले विकास कामांचे प्रस्ताव मंजूर न करण्याबाबत अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. ग्रामपंचायतींनी केलेला ठराव ग्राह्य धरला जात नाही. आमदार, खासदार यांची शिफारस आणा असा सल्ला दिला जातो.
अधिकारी हे सर्व दबावापोटी करत आहेत. लोकप्रतिनिधी हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे असल्याचे अधिकाऱ्यांना भासवतात. त्यामुळे अधिकारीही ते म्हणेल तसेच वागतात. हा तालुक्यावरील अन्याय आहे. या प्रकरणी मी उद्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेणार आहे “
विकासकामांना अडवणूक
सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीने केलेला ठराव ग्राह्य धरला जात नाही. विकासकामांना निधी दिला जात नाही, असे सांगत अप्रत्यक्षपणे आमदार शहाजीबापू पाटील यांवर निशाणा साधला आहे. हे गाऱ्हाणे मांडण्यासाठी हे ४५ ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी थेट जिल्हा परिषदेत गेले.
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील 45 गावांचे सरपंच झेडपीत धडकले. दलित वस्ती सुधारणासाठी निधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
काय झाडी, काय डोंगर या डायलॉगमुळे राज्यभर चर्चेत आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदार संघातील शेकाप पक्षाचे 45 गावचे सरपंच सोलापूर जिल्हा परिषदेत आले होते.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषद प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला. 45 गावचा विकास खुंटला आहे. जिल्हा प्रशासनकडून दलित वस्ती सुधारणासाठी समान निधी मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आमच्या कामात आमदाराचा हस्तक्षेप कशाला असा सवाल त्यांनी यावेळी केला. जिल्हा परिषद समाज कल्याणमधील दलित वस्तीच्या कामांचा आणि आमदारांचा काय संबंध असा सवाल देखील यावेळी आलेल्या सरपंचानी उपस्थित केला आहे.
अधिकाऱ्यांची घेतली भेट
या सरपंचानी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांशी भेट घेतली. त्यानंतर 45 गावांच्या सरपंचांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांची भेट घेतली. सांगोला तालुक्यातील शेकापची सत्ता असलेल्या 45 गावांच्या ग्रामपंचायतीने केलेला ठराव ग्राह्य धरला जात नाही, असे सांगत अप्रत्यक्षपणे आमदार शहाजीबापू पाटील यांवर निशाणा साधला.
चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन
सरपंचांनी दिलेल्या कामकाजाची यादी ग्राह्य धरली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी समाजकल्याण अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढू असे सांगितले.
0 Comments