दोघांवर एकीचं प्रेम, दोघांनी मिळून केला तिचा गेम
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. दोन तरुणांचं एकाच महिलेवर प्रेम होतं. मात्र ही महिला दोघांकडेही पैशाची मागणी करत असल्याने दोघांनी मिळून तिचा खून केला.
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अज्ञात ठिकाणी टाकून दिला होता. मात्र घटनास्थळी सापडलेल्या मावा पुडी आणि बारकोडच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली.
सुनिता देवी शिवकुमार यादव (वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शुभम मनोज गुळसकर (वय 22) आणि मिथिलेश डोमी यादव या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील एका शेतात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होता.
प्राथमिक तपासादरम्यान या महिलेचा गळा आवळून तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता तिचे मिथिलेश आणि शुभम या दोघांसोबत प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान पोलिसांना घटनास्थळी माव्याची पुडी मिळाली होती. तर महिलेच्या अंगावर असलेल्या ओढणीवर एका सुपर मार्केटचे नाव आढळले. दरम्यान घटनास्थळी सापडलेली माव्याची पुडी फक्त अहमदनगर येथेच मिळते.
त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि संशयित म्हणून शुभम याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली.
मिथिलेश आणि शुभम या दोघांचेही या महिलेसोबत एक वर्षापासून प्रेम संबंध होते. ही महिला या दोघांनाही वारंवार पैसे मागत होती. त्यामुळे दोघांनाही तिचा कंटाळा आला होता.
त्यावर त्यांनी कट रचून 12 जानेवारीला या महिलेला अहमदनगर येथून वडगाव कांदळी या ठिकाणी आणले. त्या ठिकाणी ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.


0 Comments