शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांच्या निधनाने मराठवाड्याची मुलुख मैदान तोफ हरपली - छगन भुजबळ
मुंबई :- शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालं. अतिशय दुःख झाले. त्यांच्या निधनाने जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणारा मण्याडचा वाघ गेला अशा शब्दात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
शोक संदेशात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधीमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून लोकांचं प्रतिनिधित्व केलं.
विधानसभेतली त्यांची भाषणं खूप गाजली. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते होते.केशवराव धोंडगे हे पाचवेळा आमदार झाले होते तर एकदा खासदार झाले होते. मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडत असल्याने त्यांना मराठवाड्याची मुलुख मैदान तोफ असंही म्हटलं जात होतं.
समस्या सहन करणाऱ्या, पिचलेल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी केशवराव धोंडगे आग्रही होते.
केशवराव धोंडगे यांनी आपल्या कामाचा ठसा कायमच आपल्या आंदोलनातून आणि आपल्या भाषणांमधून तसं आपल्या कार्यातून उमटवला. निर्भिड आणि स्वाभिमानी बाणा हे त्यांचे स्वभावविशेष होते.
त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणारा नेता कायमचा काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय धोंडगे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.


0 Comments