विषमुक्त व सेंद्रिय शेती काळाची गरज - सुशीलकुमार शिंदे
सांगोला (तालुका प्रतिनिधी):हरित क्रांतीनंतर रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतमालाच्या उत्पादनात वाढ झालेली असली तरी त्यामधून तयार होणारे अन्न आरोग्यासाठी सूरक्षित राहिलेले नाही.
त्यामुळेच आज अन्न सुरक्षेबरोबरच सुरक्षित अन्नाची जास्त गरज निर्माण झाली आहे. हे सुरक्षित अन्नाचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर सेंद्रिय शेतीला पर्याय असू शकत नाही. त्यामुळे विषमुक्त व सेंद्रिय शेती काळाची गरज असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
सांगोला येथील जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक प्रा. लि. च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, आज दवाखान्यांमध्ये वाढणार्या गर्दीसाठी रसायनमिश्रित आहार सर्वात जास्त जबाबदार आहे. म्हणूनच सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे.
ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत. आहार, विहार आणि व्यायामाच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सेंद्रिय शेतीत नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करून व पारंपारिक बियाणाचा वापर करण्याची गरज आहे.
शेतकर्यांच्या शेती खर्चात वाढ होत आहे. त्यासाठी शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळून प्रदुषणमुक्त व रसायनमुक्त शेती करण्याची वेळ आली आहे. कमी उत्पादन खर्चामध्ये सेंद्रिय शेती करुन शेतकर्यांमध्ये त्याचे महत्व वाढवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे नूतन सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार पवार,
काँगेस महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा सुनिता गायकवाड, हनुमंत मोरे, जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक प्रा. लि. चे चेअरमन अजयसिंह इंगवले, संचालक डॉ प्रशांत तेली, दादा लांडगे, संजय इंगवले आदी उपस्थित होते.


0 Comments