पंढरपूर शहरात एस. टी ने महिलेस चिरडले, महिलेचा जागीच मृत्यू !
पंढरपूर शहरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या एक बस ने महिलेस चिरडले असून सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
गेल्या काही काळापासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या बाबत सतत काही ना काही ऐकायला मिळत आहे. परिवहन महामंडळाच्या बसचे विविध कारणाने अपघात होत आहेतच पण चालकांचा बेपर्वाईपणा अधून मधून समोर येत आहे.
शहरी भागात एस टी चालवताना फारशी काळजी घेतली जात नाही हे अनेकदा दिसून आले असताना आज सरगम चोकात ही दुर्घटना घडली आहे. सरगम चौक परिसर हा अपघात प्रवण क्षेत्र बनत असून या परिसरात सतत छोटे मोठे अपघात घडताना पाहायला मिळतात.
वेळापूरच्या दिशेने जाणारी आणि येणारी वाहने या रस्त्यावर नेहमीच वेगात असतात. या मार्गावरील वाहतूक वाढलेली असून हा रस्ता नागरी वसाहतींचा आहे. इसबावी, वाखरीकडे जाणारा हा रस्ता आहे त्यामुळे नागरिकांचीही गर्दी या रस्त्यावर असते.
शिवाय अहिल्या पुलाकडे जाणारा रस्ता देखील सरगम चौकातून जातो त्यामुळे येथून वाहन चालवताना आणि पायी जातानाही खूपच दक्षता घेण्याची गरज असते. याच परिसरात आज राज्य परिवहन महामंडळाच्या बसने एका महिलेला चिरडले असून सदर महिला जागीच ठार झाली आहे
राज्य परिवहन महामंडळाची (एम एच १४ बी टी ११९०) धावती बस आलेली असताना अचानक ही महिला बसखाली आली. काही कळायच्या आत ही सगळी घटना घडली आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदर मृत महिलेचे नाव जयाबाई थिटे असल्याचे सांगण्यात आले
असून ही महिला पंचरत्न स्कूल येथे शिपाई कामगार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कामावरून परत येताना सदर महिला आपल्या घराकडे चालत निघाली होती, याचवेळी तिला एस टी ची धडक लागली आणि ती खाली पडली. त्याबरोबर एस टी चे पुढील चाक तिच्या अंगावरून गेले आणि तिचा मृत्यू झाला.
हा परिसर सतत गजबजलेला असतो त्यामुळे हा अपघात होताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. शहर पोलीस आणि वाहतूक पोलीस देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले.
अपघात आणि रस्त्यावर जमलेली गर्दी यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती आणि रस्ता सुरळीत करण्यासाठी पोलिसांना परिश्रम करावे लागत होते. येथे कायमच वाहतूकीची कोंडी होत असते परंतु याकडे फारसे गंभीरपणे लक्ष दिले जात नाही त्यामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.


0 Comments