दुर्दैवी तळ्याच्या पाण्यात विद्युत प्रवाह, चार भावंडांचा मृत्यू !
तळ्यात अंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार चिमुकल्या मुलांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे गाव आणि परिसरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
राज्यात आज एका पाठोपाठ एक दुर्घटना घडत राहिल्या आहेत. भल्या पहाटे सुरु झालेलं दुर्घटनेचे चक्र दिवसभर सुरु राहिले आणि विविध घटनांनी महाराष्ट्र आज हादरून गेला आहे. आगीच्या काही घटना आज समोर आल्या आणि त्यात काही निरपराध लोकांचे जीव गेले.
या घटनांची हळहळ व्यक्त होत असतानाच आज दुपारनंतर संगमनेर तालुक्यात चार लहान मुलांचा मृत्यू झाल्याची अत्यंत ह्रदयद्रावक घटना समोर आली. पठार भागातील खंदर माळवाडी परिसरातील वांदरकडा येथील लहानशा तळ्यात अंघोळीसाठी म्हणून गेलेल्या चार मुलांना विद्युत वाहक तारेचा शॉक बसला आणि चारही मुलांचा मृत्यू झाला.
महावितरणच्या आंधळ्या कारभारामुळे अनेक निष्पाप लोकांचे प्राण जात आहेत. विजेची विद्युत प्रवाहित तार शेतात पडून अनेक शेतकऱ्यांचा जीव आजवर गेलेला आहे.
पडलेली तार शेतात, पिकात दिसून येत नाही आणि त्यावर पाय पडताच ती जीव घेतल्याशिवाय सोडत नाही. आज तर वेगळीच घटना घडली आणि तळ्यातील पाण्यातच विजेचा प्रवाह उतरला. अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे आणि विराज अजित बर्डे ही लहानगी चार मुले अंघोळ करण्यासाठी गावाजवळ असलेल्या छोट्याशा तळ्यावर गेली होती.
अंघोळीसाठी म्हणून ही मुले तळ्यात उतरली त्यावेळी विद्युत वाहक तारेचा शॉक लागून चारही बालके तेथेच मृत्युमुखी पडली. या घटनेने दु:ख तर व्यक्त होत आहेच पण महावितरणच्या कारभाराबाबत प्रचंड संताप देखील व्यक्त होऊ लागला आहे. घटनेची माहिती कळताच नागरिकांनी या तळ्याकडे धाव घेतली आणि चारही मुलांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले.
विजेच्या तारा पाण्यात !
तळ्याच्या वरच्या बाजूने विजेच्या तारा गेलेल्या होत्या, या तारा तुटून तळ्याच्या पाण्यात पडल्या होत्या आणि या तारांत विद्युत प्रवाह सुरु असल्याने तळ्याच्या पाण्यात देखील विद्युत प्रवाह उतरला होता. या लहानशा मुलांना ही बाब दिसलीही नाही आणि पाण्यात उतरताच या चौघानाही शॉक बसला आणि चारही भावंडे जागीच मृत्युमुखी पडली.
कुटुंबाचा आक्रोश !
एकाच कुटुंबातील चार भावंडे अशा प्रकारे मृत्युमुखी पडल्याचे पाहून कुटुंबाने आक्रोश सुरु केला. एकाच घरातील चार मुले दगावल्याच्या या घटनेने गावकरी देखील शोकाकुल झाले होते. अनेकांच्या डोळ्याचे पाणी थांबत नव्हते. जेवढे दु:ख होते त्यापेक्षाही अधिक संताप व्यक्त केला जात होता. विजेच्या तारा तुटून तळ्याच्या पाण्यात पडल्या तरी महावितरण काय करीत होते ? असा संतप्त आणि जळजळीत सवाल गावकरी विचारू लागले आहेत.
0 Comments