खानापूर तालुक्यातील युवकाचा अपघातात होरपळून मृत्यू!
पलूस: शहरातील जुना सातारा रस्त्यावरील आंधळी फाट्यानजीक पहाटेच्या सुमारास गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातामधील गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तसेच वाहन चालकाच्या शरीराचा बराचसा भाग जळून गेला हाेता. खानापूर तालुक्यातील बलवडी मधील मकबूल गौसलाजम पटेल (वय २५) या युवकाचा अपघातात होरपळून मृत्यू झाला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मकबूल नेहमी कामा निमित्ताने बाहेर असायचा. त्याचा फळांचा व्यापार आणि केळी निर्यातीचा व्यावसाय आहे. अपघाताच्या दिवशीही त्याने घरी यायला रात्री उशीर होईल असे फोन करून घरी सांगितले होते. पलूसकडून बलवडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंधळी फाट्याच्या जवळ त्याच्या गाडीला अपघात झाला.
ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे या अपघाताची कोणालाही कल्पना नव्हती. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या अपघातात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मकबूल यांच्या शरीराचा बहुतांश भाग जळाला होता.
दरम्यान, पलूस पोलिसांनी घटनास्थळचा पंचनामा केला. कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे.
0 Comments