शरद पवार कुठेही फिरले तरी त्यांचा आकडा ५० आमदारांच्या वर जात नाही- आ शहाजीबापू पाटीलशिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील सतत आपल्या विधानांमुळे चर्चेत रहात आहेत. आता परत एकदा त्यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली आहे. शरद पवारांनी एकदा महाराष्ट्राचा दौरा केला की राष्ट्रवादी सत्तेत येते, असा दावा सुप्रिया सुळेंनी केला होता. मात्र, शरद पवार कुठेही फिरले तरी त्यांचा आकडा ५० आमदारांच्या वर जात नाही. एवढ्यातच त्यांचा खेळ सुरू आहे, असा टोला शहाजीबापू यांनी लगावला आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी चिमटे काढले आहेत. अजित पवार यांनी म्हटले होते की, उद्धव ठाकरे आणि शिंदेंचे भाषण सोबतच सुरू झाल्यास आधी ठाकरेंचे भाषण ऐकणार. यावरून अजित पवारांनाटोला लगावत शहाजीबापू म्हणाले की. 'अजित दादा आधी उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणार आहेत. दादाला आता भाषण ऐकण्याशिवय काही काम उरलं नाही, इंदुरीकर महाराज यांची कीर्तनं त्यांनी ऐकावी.'
यासोबतच दसरा मेळाव्यावरूनही त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. शिवतीर्थावर जाणारे पवारांच्या विचाराचे, तर बीकेसीवर जाणारेबाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक असतील, असे आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटले. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर तर शिवतीर्थावर ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे. बीकेसी मैदानावर होणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा जोरदार होणार आहे.
जे शिवतीर्थावर जातील ते शरद पवार यांच्या विचाराचे तर बीकेसीवर जमणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला डिवचले आहे. शहाजीबापू पुढे म्हणाले की, शरद पवार यांचे ५० च्या वर आमदार येत नाहीत. राज्यात आणि देशात फिरले तरी ५० आमदारांच्या वर ते जात नाहीत. एवढ्यातच त्यांचा सगळा खेळ सुरू आहे, असा टोला पवारांना लगावला आहे.
0 Comments