पक्षाच्या नावासाठी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ‘हे’ 3 पर्याय सादर?
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. चिन्ह गोठवण्यात आल्यानं आता उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाहीये. सोबतच शिवसेना या नावाचा देखील वापर करता येणार नाहीये.
हे आदेश निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत लागू असणार आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सूत्रांकड़ून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे ठाकरे गटाकडून पक्षाच्या नावासाठी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय सादर करण्यात आले आहेत.
ज्यामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांचा समावेश आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे पक्षाच्या नावासाठी ठाकरेंच्या तीन पिढ्यांची नावं आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत.
चिन्हासाठी तीन पर्याय
दरम्यान नावाप्रमाणेच उद्धव ठाकरे गटाकडून चिन्हाच्या निवडीसाठी देखील तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहेत. त्यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीन पर्यायांचा समावेश आहे. यापैकी एक चिन्ह मिळावे अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
पक्षाची विचारसरणी, भूमिका आणि राजकीय वाटचालीशी मेळ साधणारे चिन्ह गटाला मिळावे यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत.
0 Comments