google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरी चोराची कोल्हापुरी करामत !

Breaking News

सोलापुरी चोराची कोल्हापुरी करामत !

 सोलापुरी चोराची कोल्हापुरी करामत !

कोल्हापूर : सोलापुरी चोरट्याने कोल्हापुरात जाऊन आपल्या करामती दाखविण्याचा केलेला प्रयत्न फसला असून या चोरट्यास काही साहित्यासह पकडून त्याच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. 


 अलीकडे वेगवेगळे प्रकार वापरून चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे तसे हे चोरटे आपला परिसर वगळून परजिल्ह्यात जाऊन देखील चोरी करू लागले आहेत. दूर अंतरावर जाऊन चोरी करून परत आपल्या गावात आल्याने पोलिसांना देखील हुलकावणी देता येते आणि पोलीस सहजासहजी चोरांपर्यंत पोहोचणार नाहीत अशी या चोरांची कल्पना असावी तथापि पोलीस तपास हा कुठेही पोहोचू शकतो हे मात्र अनेक घटनांनी दाखवून दिले आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील एका चोरीने कोल्हापूर जिल्ह्यात जाऊन आपला हात साफ करण्याचा प्रयत्न केला पण या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी (द. सोलापूर) येथील ४२ वर्षे वयाचा राजकुमार पंडित विभूते याला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यात असलेल्या पेठ वडगाव येथील एका चोरी प्रकरणी पकडले आहे. लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय कटरने फोडून चोरी केल्याच्या आरोपातून विभूते याला पकडले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळ लक्ष्मी टेकडी परिसरात अटक करण्यात आली आहे. हा सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य, विमा कंपनीचे चेकबुक आणि एक चार चाकी वाहन असा जवळपास ४ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 


या सोलापुरी भामट्याने विमा कंपनीचे कार्यालय कटरने फोडले, जवळपास ६ लाख ८० हजार रुपयांची रोकड, चेकबुक असे विविध साहित्य चोरले होते. संशयित आरोपी राजकुमार विभूते हा एका चार चाकी वाहनातून पुणे- बंगळूरू मार्गावरून जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. 


प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी या मार्गावर सापळा लावला आणि लक्ष्मी टेकडी परिसरात विभूते याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पकडल्यानंतर त्याच्याजवळील चार चाकी वाहनाची तपासणी केली असता चोरीच्या गुन्ह्यासाठी वापरलेल्या हत्यारासह विमा कंपनीचे चेकबुक देखील आढळून आले आहे. सुरुवातीला आपण त्या गावाचे नाहीच असे दाखविणाऱ्या विभूते याने पोलिसी खाक्या दाखवताच पेठ वडगाव येथील चोरीची कबुली देवून टाकली. 


चोरीची जय्यत तयारी !

सोलापुरी चोर हा सामान्य चोर नसून तो सराईत आहे हे त्याच्याजवळील सापडलेल्या साहित्यावरून स्पष्ट होत आहे. चोरी करण्यासाठी वापरले जाणारे विविध साहित्य त्याच्याकडे आढळून आले आहे. तीन गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, नौजल, दोन कटर, हेक्सा ब्लेड, ग्राइंडर कटर मशिन, रबरी पाईपसह तयार केलेला सेट, लोखंडी कातावणी, कोयता, बॅटरी असे साहित्य या सोलापुरी चोरांकडे आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे.

Post a Comment

0 Comments