google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहाजीबापूंच्या मंत्रीपदाचं काय झालं?

Breaking News

शहाजीबापूंच्या मंत्रीपदाचं काय झालं?

 शहाजीबापूंच्या मंत्रीपदाचं काय झालं? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास  अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या मंगळवार, (ता. ९ ऑगस्ट) दुपारी १२ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे सहा, तर भाजपच्या सहा आमदारांचा समावेश असेल. यामध्ये दोन पाटलांचा समावेश असला तरी सांगोल्याच्या शहाजीबापू पाटील यांचे नाव चर्चेत कुठेच दिसत नाही. एवढे दिवस संपूर्ण महाराष्ट्राला हसविणाऱ्या या नेत्याला धत्तुराच मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले होते. मंत्रिमंडळाचा विस्तार तारीख पे तारीख पुढे ढकलला गेला. त्यामुळे विरोधी पक्षांकडून सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली होती.


भाजपकडून कोणाला मंत्रिपद?

अखेर विस्तार कार्याची प्रतिक्षा संपली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीहून परतले. आज सकाळी फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार उद्याच करण्याचे ठरविण्यात आले. मंगळवार, (ता. ९ ऑगस्ट) दुपारी १२ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , राधाकृष्ण विखे पाटील  सुधीर मुनगंटीवार  आणि गिरीश महाजन  या चार नावांना हिरवा कंदील दाखवला असल्याचे वृत्त आहे.


शिंदे गटाकडून कोणाची वर्णी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडूनही सहा आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, माजी कृषीमंत्री दादा भुसे, माजी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, माजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळेल असे खात्रीलायक सांगण्यात येत आहे. बहुतांश मागील सरकारमधील मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


शहाजीबापूंच्या मंत्रीपदाचं काय झालं?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जवळपास ४० हून अधिकआमदारांनी सूरत गाठली. त्यात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हेही होते. सर्व आमदारांना गुवाहाटी येथे नेण्यात आल्यानंतर सर्वजण तेथे रमले. शहाजी पाटील जरा जास्तच रमले. ओसाड माळरान, दुष्काळी भागातून गेलेल्या या नेत्यावर गुवाहाटीच्या डोंगर, झाडी आणि हॉटेलाने मोहिनी घातली.


“काय झाडी… काय डोंगार… काय हॉटेल… एकदम ओक्के…” अशा शब्दांत त्यांनी तेथील निसर्गाचे यथार्थ वर्णन केले. ते महाराष्ट्राला तुफान आवडले. अनेक गीते तयार झाली आणि गाजली.


शहाजी पाटील यांच्या प्रत्येक वाक्यातून विनोद तयार होत असल्याने प्रसार माध्यमांनाही त्यांची भुरळ पडली. एबीपी माझा कट्टा, चला हवा येऊ द्या अशा लोकप्रिय कार्यक्रमांत शहाजी पाटील यांना बोलावणे आले.


सांगोला तालुक्याचा जीव टांगणीला

शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या रूपाने सांगोला तालुक्याला मंत्रिपद मिळाले होते. मात्र आता ते हयात नाहीत. त्यांच्या पश्चात आमदार शहाजी बापू पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता सांगोला तालुकावासियांना वाटत होती. अजूनही ही आशा संपलेली नाही. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आणखी काही दिवसांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. त्या विस्तारावेळी तर शहाजीबापू पाटील यांना मंत्रिपद मिळेल का? अशी चर्चा सांगोला तालुक्यात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments