google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुर जिल्ह्यात 'या' विद्यार्थ्यांना 'पावसाळी' सुट्टी !

Breaking News

सोलापुर जिल्ह्यात 'या' विद्यार्थ्यांना 'पावसाळी' सुट्टी !

 सोलापुर जिल्ह्यात 'या' विद्यार्थ्यांना 'पावसाळी' सुट्टी !

सोलापूर : पावसाळ्याचे दिवस असल्याने  आजारांचे प्रमाण वाढू लागल्याने आजारी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. 


विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी असतेच पण आता पावसाळ्यात देखील आजारी विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु असून लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना सद्या 'पावसाळी' आजाराचा फटका बसत असून रुग्णालयात देखील गर्दी वाढत आहे. 

लहान शाळकरी मुलांना देखील पावसाळी आजारांचा सामना करण्याची वेळ आली असून घराघरात लहान मुले आजारी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना शाळेत जाणे शक्य होत नाही. ताप, खोकला, सर्दी अशा प्रकारच्या विकारांनी लहान मुले त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. शाळा आणि शिक्षकांच्या भीतीने आजारी असतानाही विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. 


पावसाळी आजाराच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण विभागाने एक चांगला निर्णय घेतला असून आजारी असलेल्या मुलांना शाळेत येण्याची सक्ती न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

आजारातून पूर्ण बरे होईपर्यंत आठ - दहा दिवस या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात यावी असे निर्देश शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली आहे. त्यामुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यास शाळेत उपस्थित राहण्यापासून सूट मिळणार आहे. आजारी विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.


यावर्षी १५ जून पासून शाळा सुरु झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत कमी आहे. अद्याप २० टक्के विद्यार्थी शाळेत जात नाहीत.  सोलापूर जिल्हा परिषदेच्या २ हजार ७९७ शाळांत २ लाख ६ हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद राहिल्या आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. 

 हे नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाचे नेटचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार  यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची एक कार्यशाळा घेतली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आणि गुणवत्तेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.   


कोरोनाचा प्रादुर्भाव अजून पूर्णपणे संपला नसून कोरोना बाधित रुग्णांची वाढ झालेली आहे. त्यामुळे आजारी मुलांना शाळेत येण्याची सक्ती न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेत आलेला विद्यार्थी आजारी असल्याचे आढळल्यास त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात यावेत आणि त्याला त्याच्या घरापर्यंत सोडण्यात यावे अशा सुचनेबरोबरच शाळांची पटसंख्या आणि पटनोंदणी शंभर टक्के होण्यासाठी देखील प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले

 आहे.  शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून त्या त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ही मुले शाळेत का यात नाहीत याच्या कारणांचा शोध घेतला जावा अशा देखील सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिल्या आहेत .

Post a Comment

0 Comments