मोठी बातमी : तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात
मुंबई : तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. आज सकाळी राऊतांच्या बंगल्यावर ईडीच्या पथकाने त्यांच्या घरी छापेमारी केली होती. काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने राऊत यांना समन्स बजावले होते. मात्र अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळेच आज ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत काही कागदपत्र समाधानकारक देवू न शकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या डोक्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी राऊतांच्या बंगल्यासमोर मोठी गर्दी केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते जोरदार घोषणा देत आहेत. सुरक्षा रक्षकांनी राऊतांच्या घराबाहेर पहारा सुरू केला असून कुणालाही मध्ये येण्याास मज्जाव घालण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पत्राचाळ येथील जागा म्हाडाने विकसनासाठी दिली होती. त्याबदल्यात वाधवान बिल्डर्सला एफएसआय देण्यात आला होता. पण वाधवान बिल्डर्सने एफएसआय इतरांना विकला. त्याबदल्यात पैसे घेतले. तसेच विकसनाच्या नावाखाली बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले. त्यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.
याप्रकरणी म्हाडासह इतर बिल्डरांचेही नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी सुरू झाली. प्रविण राऊत यांना त्यानंतर अटक करण्यात आली. राऊतांच्या माध्यमातून संजय राऊतांच्या पत्नीला पन्नास लाख रुपये दिल्याचे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात आता संजय राऊतांचाही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.
0 Comments