राज्यातील सत्ता संघर्षाबाबत आता सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी
राज्यात सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर सुप्रीम कोर्टात उद्या होणारी सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी तीन ऑगस्टला होणार आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासह इतर सर्व याचिकांवर सरन्यायाधीश रमणा यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा निर्णय तीन ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का? हेही याच दिवशी कळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने दोन्ही बाजूंना शपथपत्र दाखल करण्यास सांगितले होते. यानंतर दोन्ही बाजूंनी कोर्टात शपथपत्र दाखल करण्यात आले आहे. कुठल्या घटनात्मक बाबींवर सुनावणी हवी याबाबत तीन ऑगस्टला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद कोर्ट निश्चित करणार आहे. बतच निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का हेही यादिवशी कळणार आहे.
शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली होती. या सुनावणीत न्यायालयाचे सरन्यायाधीश रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या बाजूने आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने परिस्थिती जैसे थे ठेवत ही सुनावणी एक ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र, आता ही सुनावणी तीन ऑगस्टला होणार आहे.
0 Comments