गुपचूप उरकला बालविवाह, दोनशे जणांवर गुन्हा !
पंढरपूर : बालविवाहास कायद्याने बंदी असतानाही गुपचूप बालविवाह उरकण्यात आला परंतु नंतर मात्र पोलिसांनी दोनशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील एका वस्तीवर हा विवाह करण्यात आला.
कायद्यानुसार बालविवाह करण्यास मनाई आहे आणि याची माहिती असताना देखील अत्यंत गुपचूप पद्धतीने बालविवाह होताना दिसतात. प्रशासनाला याचा सुगावा लागताच संबंधित पथक विवाहाच्या ठिकाणी धडकते आणि बालविवाह होण्यापासून रोखले जाते. असे विवाह होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक असून विवाहाबाबत गावात अनेकांना आधीच माहित असते परंतु याबाबत कुणी तक्रारी करीत नाहीत किंवा प्रशासनाला कळवत नाहीत. त्यातूनही प्रशासनाला खबर लागते आणि अनेक बालविवाह रोखल्याची घटना घडलेल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील देखील काही बाल विवाह प्रशासनाने वेळीच रोखले आहेत परंतु पंढरपूर तालुक्यातील एक बाल विवाह झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तब्बल दोनशे लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील खर्डी परिसरात एच पी पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या चव्हाण मळ्यात भर दुपारी एक बालविवाह करण्यात आला. पोलिसांना या विवाहाची माहिती मिळाली तेंव्हा पोलीस तातडीने खर्डीकडे धावले पण तोपर्यंत हा विवाह झालेला होता. बालविवाह झाल्याची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी भगवान कुलकर्णी तसेच पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेवून विवाहाबाबत खात्री करून घेतली. बालिका वधूच्या पित्याकडे या पथकाने मुलीच्या वयाची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेर खात्रीसाठी मुलीच्या जन्मतारखेचा दाखला प्राप्त करून घेण्यात आला. सदर दाखल्यानुसार विवाह झालेल्या मुलीचे वय १४ वर्षे ८ महिने असल्याचे समोर आले.
वऱ्हाडी मंडळी गोत्यात !
अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याने दिसून आल्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांसह शंभर ते दोनशे जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६, कलम १० नुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे नातेवाईक, नवऱ्याचे नातेवाईक, विवाह लावणारा पुरोहित, छाया चित्रकार आणि ग्रामपंचायत सदस्यासह लग्नाला उपस्थित असलेल्या लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 Comments