काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने पाठवली नोटीस!
नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने आज, बुधवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी तपास संस्थेने २०१५ मध्येच बंद केली होती. ईडीकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसवर काँग्रेसने टीका केली आहे. भाजपकडून आपल्या राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
तसेच, काँग्रेस नेते आणि वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीही केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. आपल्या राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजपकडून तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. नॅशनल हेराल्डचा स्वतःचा एक इतिहास आहे, जो स्वातंत्र्याच्या संघर्षकाळापासून सुरू झाला होता, असे ते म्हणाले. ममता बॅनर्जी, फारूख अब्दुल्ला यांच्यासह सर्व विरोधी पक्षांचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत, असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनीही भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. १९४२ मध्ये जेव्हा नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते, त्यावेळी इंग्रजांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. आज मोदी सरकारदेखील तेच करत आहे. त्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे, असे सूरजेवाला म्हणाले.


0 Comments