‘म्हाडा’च्या घरांबाबत मोठा निर्णय, ठाकरे सरकारकडून ‘ही’ पद्धती बंद..!!
म्हाडा… महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण.. महाराष्ट्रातील नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत हक्काचा निवारा देणारी संस्था.. नागरिकांना त्यांच्या उत्पन्नानुसार, ‘म्हाडा’तर्फे घरे दिली जातात.. आतापर्यंत लाॅटरीप्रमाणे या घरांचे वितरण होत होते… मात्र, आता घर वितरणाच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे..
‘म्हाडा’च्या (MHADA) विविध मंडळांमार्फत काढण्यात येणाऱ्या लाॅटरीतील प्रतीक्षा यादी आता रद्द करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. 24) काढलेल्या औरंगाबाद मंडळाच्या सोडतीपासून हा निर्णय लागू करण्यात आला. प्रतीक्षा यादीमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने ती पद्धती बंद केल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली..
प्रतीक्षा यादीची पद्धती
आतापर्यंत ‘म्हाडा’च्या विविध मंडळांमार्फत उपलब्ध घरांची सोडत काढली जात होती.. त्यात विजयी व प्रतीक्षा यादीतील नागरिकांची नावे जाहीर केली जात. लाॅटरीतील विजयी अर्जदाराच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असे.. त्यात तो अर्जदार अपात्र ठरल्यास त्याच्याऐवजी प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या अर्जदाराला संधी मिळत होती.
समजा, 10 घरे असतील, तर 10 विजेते जाहीर केले जात. तसेच, एकास तीन याप्रमाणे 30 जणांचा प्रतीक्षा यादीत समावेश असे.. मूळ विजेता अपात्र ठरल्यास, प्रतीक्षा यादीतील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला संधी मिळत होती. तो अपात्र ठरल्यास, दुसऱ्या क्रमांकावरील विजेता.. अशी ही प्रक्रिया पुढे जात होती.
‘म्हाडा’च्या सोडत प्रक्रियेत ‘प्रतीक्षा यादी’ अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे समोर आले.. त्यामुळे ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाने प्रतीक्षा यादीच बंद करण्याचा प्रस्ताव मांडला हाेता. गृहनिर्माण विभागाने हा प्रस्ताव मान्य केला असून, त्यानुसार प्रतीक्षा यादी बंद केल्याची माहिती मंत्री आव्हाड यांनी दिली.
वर्षांनुवर्षे घरे रिकामी
‘म्हाडा’तील प्रतीक्षा यादीच्या पद्धतीमुळे वर्षानुवर्षे ही घरे रिकामी पडून राहत. त्यामुळे ‘म्हाडा’चे आर्थिक नुकसान होत होते. 2014 पासूनच्या सोडतीतील घरांचे वितरण अजूनही सुरूच असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई मंडळाने प्रतीक्षा यादी रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
सुरुवातीला हा निर्णय केवळ मुंबई मंडळासाठी लागू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, आता तो सर्व विभागीय मंडळांसाठी लागू करण्यात आला आहे. आता विजेता अपात्र ठरल्यास, त्याचे घर पुढच्या सोडतीत समाविष्ट केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.


0 Comments