सांगोला तालुक्यातील जवळा येथे अनिष्ट प्रथेला मूठमाती, विधवा महिलांचा केला सन्मान
आजही समाजात विधवा महिलांना दुजाभावाची वागणूक मिळताना दिसते. या प्रथेला मूठमाती देऊन विधवा महिलांच्या हस्ते एका प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आल्याची सुखद घटना सांगोला तालुक्यातील जवळा गावात घडली.
जवळा : अतुल गयाळी
देश महासत्तेकडे आगेकूच करीत असताना आजही समाजात विधवा महिलांना दुजाभावाची वागणूक मिळताना दिसते. या प्रथेला मूठमाती देऊन विधवा महिलांच्या हस्ते एका प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आल्याची सुखद घटना सांगोला तालुक्यातील जवळा गावात घडली.
त्याचे झाले असे. जवळा गावामध्ये माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या कला कौशल्य महिला ग्रुप जवळा, वसुंधरा संवर्धन संस्था व जवळा कोविड ग्रुप यांच्या वतीने मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक महिना चाललेल्या सदर प्रशिक्षणासाठी १०० प्रशिक्षणार्थी गरजू महिला व मुली यांनी सहभाग घेतला. सहभागी महिलांना सौ. संगीता सुरवसे, मयुरी खराडे, गीतांजली आलदर, शशिकला चडचणकर, सुनीता सुतार, सीमा नरळे या महिला प्रशिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले.
या शिवण क्लासचा समारोप शनिवारी झाला. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून सौ. रूपमतीताई दिपकराव साळुंखे-पाटील तसेच जवळा गावच्या सरपंच सौ. सविता बर्वे, उपसरपंच नवाज खलिफा, ग्रामपंचायत सदस्या सौ. मीनाताई सुतार, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल गयाळी, ग्रामपंचायत सदस्य सज्जन मागाडे यांची उपस्थिती होती.या प्रशिक्षणामध्ये सहभागी महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ काढण्यात आला यामध्ये सौ. रुपमती साळुंखे-पाटील यांचेतर्फे एक शिलाई मशीन, जवळा कोविड ग्रुप व ग्रामपंचायत सदस्य सज्जन मागाडे यांच्यातर्फे प्रत्येकी एक शिलाई मशीन देण्यात आली.
या लकी ड्रॉमध्ये साक्षी मागाडे, संघमित्रा जगधने, वैशाली नाडगे या भाग्यवान विजेत्या मानकरी ठरल्या. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना वसुंधरा संवर्धन संस्थेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. बक्षीस वितरण सौ. रूपमती साळुंखे-पाटील यांनी विधवा महिला अनिता बोराडे व शामबाला जगताप यांना बोलावून त्यांना हळदी कुंकवाचा मान देऊन बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते केले.
या कार्यक्रमामध्ये हेरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील ग्रामपंचायतीने महिलांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा महिला ठराव ग्रामपंचायतीने संमत केला. अशाच प्रकारची मागणी जवळा पोलीस पाटील यांनी पत्राद्वारे ठराव मंजूर करण्यासाठी सौ. रुपमतीताई साळुंखे पाटील, जवळा गावच्या सरपंच सौ सविता बर्वे, उपसरपंच नवाज खलिफा व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
यावेळी अनेक महिलांनी मनोगत व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी कोविड ग्रुप जवळा सदस्य डॉ. निलेश इंगोले, अनिल सुतार, बंडू सुतार, रवी स्वामी , राजाभाऊ सरवदे, विठ्ठल गयाळी, शेटे सर, सज्जन मागाडे, पोलीस पाटील अतुल गयाळी, बचत गटाच्या महिला पंडित मॅडम, भोसले मॅडम,भोसले मॅडम, वेळापुरे मॅडम व त्यांच्या सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिवण क्लासच्या प्रशिक्षणाबरोबरच आम्हाला सौ. रूपमतीताई साळुंखे-पाटील यांची मायेची पाखर मिळाली. आम्ही कोपरा धरून बसणाऱ्या महिलेला समोर बोलावून हळदी कुंकवाचा मान देऊन सन्मान केला. त्यामुळे जीवन नव्याने जगण्याची उमेद निर्माण झाली. मला जसा मान सन्मान मिळाला तसा मान सन्मान सर्व विधवा महिलांना समाजाने मिळवून द्यावा ही विनंती. – अनिता बोराडे
विधवा महिलांचे जीवन किती कठीण असते. याची कल्पनाच करता येत नाही. परंतु सदर कार्यक्रमांमध्ये सौ रुपमतीताई साळुंखे पाटील यांनी आम्हाला कार्यक्रमामध्ये समोर बोलावून हळदी कुंकवाचा मान देऊन विशेष सन्मान केला. त्या सन्मानाने आज समाजामध्ये जीवन जगण्याची उमेद निर्माण झाली मन भरून आले. माझ्यासारख्या सर्वच विधवा महिलांना समाजामध्ये मान सन्मान मिळावा .यासाठी गावातील ग्रामपंचायत ,समाज सेवक ,पोलीस पाटील यांनी पुढाकार घेऊन या जुन्या रूढी परंपरा यांना आळा घालून विधवा महिलांना मानसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
समाजामध्ये विधवा महिलांना जी अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यांच्यावर ती जुन्या रूढी परंपरा लादल्या जातात. त्या कुठेतरी आता संपुष्टात याव्या व विधवा महिलांना मानसन्मान व सन्मानपूर्वक वागणूक समाजाने दिली जावी. यासाठी महिलांनीच महिलांच्या अडीअडचणी व बाजू समजून घेऊन विधवा महिलांना हळदीकुंकवाचे कार्यक्रम, सुहासिनीचे कार्यक्रम यामध्ये बोलावून त्यांना मानसन्मान द्यावा. – सौ. संगीता सुरवसे, माजी सरपंच


0 Comments