आम्ही चवन्नी छाप लोक ठेवणार नाही, तर देश घडवणारी टीम तयार करू : नाना पटोले
नागपूर : अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवला, तेव्हापासून देशभरात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्यावर राजकारणाचाही आरोप आहे. मात्र यावर काय करायचे हा सरकारचा विषय आहे. आम्ही याबद्दल बोलू इच्छित नाही. कारण राजकारणात धर्म आणू नये ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
संभाजीराजे आमच्यासाठी आदरणीय
काँग्रेस संभाजीराजे भोसले यांना पाठिंबा देणार का? असे विचारले असता नाना पटोले म्हणाले की, या विषयावर महाविकास आघाडीची कोणतीही बैठक झालेली नाही. संभाजीराजे आमच्यासाठी आदरणीय आहे. महाविकास आघाडीत हा मुद्दा चर्चेला आल्यावर काय करायचे ते पाहू. महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होईल, त्यावेळी या विषयावर बोलू. कारण अजूनही काही ठरवलं नाही तर आता बोलणार आणि मग गोंधळ व्हायच. त्यामुळे काय ते नंतरच बोलणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.
देशात धर्माच्या नावावर राजकारण सुरू
देशात धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे. देश उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहे. प्रत्येकाने सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. मात्र विविध गैरसमज पसरवून देशातील वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न पेटले आहेत. केंद्र सरकारने या प्रश्नांची उत्तरे दिल्यास आम्ही त्याचे समर्थन करू. आता देशात महागाई कमी करायची आहे, बेरोजगारी दूर करायची आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्यावर चर्चा व्हायला हवी. या प्रश्नांसाठी आम्ही आंदोलन करू, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.
महिलांचा आदर ही काँग्रेसची संस्कृती
महिलांवर हात उचलणाऱ्यांचे हात तोडू, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिलांचा आदर ही काँग्रेसची संस्कृती आहे. काँग्रेसने महिलांना पंतप्रधान आणि राष्ट्रपती दिले. महिलांच्या प्रतिष्ठेला कोणीही कमी लेखू नये. बाकी काम कायदा करेल, असे म्हणत काँग्रेसच्या आयटी सेलचे नागपुरात शिबिर सुरू आहे. परंतु, आम्ही आयटी सेलमध्ये चवन्नी छाप व भाडोत्री लोक ठेवणार नाही. भाजप आयटी सेलवर रोज ४० कोटी रुपये खर्च करत आहे. आम्ही मात्र देश घडवणारी टीम तयार करू, असे पटोले म्हणाले.


0 Comments