खासगी प्रवासी वाहतुकीसाठी राज्य सरकारकडून योजना जाहीर..!
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या खासगी प्रवासी वाहतूक सुरु आहे. बर्याचदा खासगी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना कोंबून त्यांची धोकादायकपणे वाहतूक केली जाते. त्यातून अनेकदा अपघात होऊन प्रवाशांचे बळी गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी वाहतुकीसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या खासगी प्रवासी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने ‘मॅक्सी कॅब’ योजना जाहीर केलीय. या योजनेअंतर्गत खासगी वाहतुकीला परवाना दिला जाणार असून, त्यांच्यासाठी खास नियम जारी केले जाणार आहेत..
राज्यात खासगी ‘मॅक्सी कॅब’ वाहतुकीला परवाना देण्यासाठीच्या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली आहे. खासगी वाहतुकीला शिस्त लावणे, तसेच त्यातून सरकारी तिजाेरीत उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही समिती अभ्यास करणार आहे. पुढील तीन महिन्यांत ही समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे..
समितीवरील जबाबदारी..
‘मॅक्सी कॅब’ वाहनांना परवाने देण्याबाबत योजना तयार करताना प्रवाशांची सोय, सुरक्षितता, वाहनांच्या कराचा दर, एसटी महामंडळाच्या महसूलावर होणारा संभाव्य परिणाम आदींचा अभ्यास ही समिती करणार आहे.
खासगी वाहनांकडून सरकारला मिळणारा महसूल, खासगी वाहनांना द्यायचे क्षेत्र, मार्ग, परवाना संख्या व इतर बाबी तपासणार आहे. त्यानंतर ही समिती पुढील तीन महिन्यांत सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे.
दरम्यान, समितीच्या अध्यक्षपदी माजी आयएएस अधिकारी रामनाथ झा यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, एसटी महामंडळाचे अध्यक्ष शेखर चन्ने, अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, तसेच सदस्य सचिव म्हणून परिवहन उपायुक्त अभय देशपांडे हे काम पाहणार आहेत.
0 Comments