आता होणार शिक्षकांची चारित्र्य तपासणी, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय…!
शालेय विद्यार्थी-पालकांसह शिक्षकांसाठीही महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.. विशेषत: विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विद्यार्थी-शिक्षकांमधील नात्याबाबत सवाल उपस्थित होत आहेत.
विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्द्यावर शाळांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना, शिक्षण विभाग शाळांवर काय कारवाई करतो, असा प्रश्नही पालकांमधून उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने यंदा मोठा निर्णय घेतला आहे..
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षक, प्रशासक, कर्मचारी, शिपायांची चारित्र्य पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याबाबत शाळांना आदेश दिले जाणार आहेत, तसेच त्याच्या अंमलबजावणीकडे शालेय शिक्षण विभागाचे लक्ष असणार आहे..
कशी करणार तपासणी..?
खासगी शाळांमध्ये नव्या सत्रात शिक्षकांची नेमणूक होते वेळी शिक्षकाची इत्थंभूत माहिती संस्थेकडे असावी
नेमल्या जाणाऱ्या शिक्षकांवर पूर्वी एखादा गुन्हा तर दाखल नाही ना, याबाबत माहिती घेतली जाईल.
शाळांमध्ये बसविण्यात येणारे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे कार्यान्वित आहेत की नाही, याची तपासणी केली जाईल.
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळांनी करावा, अशा सूचना देणार असल्याचे आयुक्त मांढरे यांनी सांगितले.
राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे नुकतेच औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.. ते म्हणाले, की “शालेय शिक्षण विभाग शिक्षकांचे ‘कॅरेक्टर व्हेरिफिकेशन’ करण्याचा विचारात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. लवकरच त्याबाबतची स्पष्टता होईल. नवे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होत असून, त्यावेळीच हे बदल केले जाणार आहेत..”


0 Comments