आता मुलांच्या पालकांसाठीही अभ्यासक्रम येणार..! केंद्र सरकारचा मोठा निर्णय..!
प्रत्येकालाच आपलं बाळ सदृढ नि हुशार असावं, असं वाटतं.. त्याला आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी पालक जिवाचं रान करतात. मात्र, बऱ्याचदा बाळाचं संगोपन कसं करावं, याबाबत पालकांनाही पुरेशी माहिती नसते.. त्याचा परिणाम बाळाच्या पुढील आयुष्यावर होण्याची शक्यता असते..
खरं तर बाळाची पहिली दोन वर्षे स्वतःची ओळख होण्यातच जातात. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून ते जवळची व्यक्ती व दुसऱ्या व्यक्तीतील फरक समजू लागते. त्यामुळे पहिल्या 3 वर्षांत पालकच बाळाचे ‘गुरु’ असतात. ही बाब लक्षात घेऊन, बाळाचा सांभाळ कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकार पालकांसाठी खास अभ्यासक्रम तयार करतेय.
याबाबत केंद्रीय शिक्षण सचिव अनिता करवाल यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, की “देशात प्रथमच 3 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आई-वडिलांसाठी अभ्यासक्रम तयार केला जात आहे. त्या माध्यमातून मुलांना शाळेत पाठवण्याआधी त्यांचा मेंदू वेगानं विकसित व्हावा, यासाठी घरीच त्याचं पालन-पोषण कसं करावे, याबाबत आई-वडिलांना शिकवण दिली जाईल..”
“मुलांशी केवळ मातृभाषेत बोललं जावं, यावर या अभ्यासक्रमात भर दिला जाईल. कारण, सुरुवातीच्या काळात मूलं ऐकूनच शिकत असतात. त्यातही मातृभाषेत ते सर्वात जास्त वेगानं शिकतात. त्यातून त्यांच्या मेंदूचा विकास जलद गतीनं होतो. पुढे जाऊन मुलाचे कौशल्य शिक्षण आणि क्षमता वाढवण्यात मदत होते,” असे त्या म्हणाल्या.
घरातील टिव्हीवर कार्टुन लावले तरी ते मातृभाषेतच असावे. स्थानिक नाव घेता येतील, अशीच खेळ, खेळणी असावित. आवाजातून शिकण्याची समज वाढते. त्यामुळे आईनं मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी सांगाव्यात, असे आवाहन त्यांनी केलं.
आई-वडिलांसाठीही अभ्यासक्रम
करवाल म्हणाल्या, की “देशात आतापर्यंत अभ्यासक्रम तयार करताना, फक्त मुलांच्या शिक्षणावर भर दिला जायचा. मात्र, आता नव्या धोरणात आई-वडिलांसाठीही अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे.. त्यात आपल्या बाळासोबत आई-वडिलांची वागणूक कशी असावी, याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे त्या अभ्यासक्रमात दिली जाणार आहेत…”
बाळाच्या मेंदूचा 90 % विकास पहिल्या 3 वर्षांतच होत असतो.. जगभरातील संशोधनाने ही बाब सिद्ध केलीय. वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत मेंदूत न्यूरॉन (मज्जातंतू पेशी) आणि सिनेप्सेस (मज्जातंतू कनेक्शन) हे 10 लाख प्रति सेकंद वेगानं विकसित होतं असतं. ‘सिनेप्सेस’ची संख्या सुमारे 10 खर्वपर्यंत (1000 ट्रिलियन) असते.
किशोरावस्थेत मेंदूत सिनेप्सेसची संख्या निम्म्याने कमी होते. म्हणजेच, 3 वर्षांपर्यंत सकारात्मक अनुभवांमुळे मेंदूचा सर्वात चांगला विकास होतो. त्यामुळे कौशल्य व क्षमतांचा पाया रचला जातो. भविष्यात उच्च कौशल्यासाठी ते गरजेचं असल्याचं मत करवाल यांनी व्यक्त केलं…


0 Comments