सांगोला तालुक्यातील घटना जवळ्यानंतर नराळेत बोगस डॉक्टरचा भांडाफोड
कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना ग्रामीण भागातील लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन डॉक्टरकी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. जवळा येथे मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या बोगस डॉक्टर कारवाईनंतर सांगोला तालुक्यातील नराळे गावातील डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. पदवीविना इंजेक्शन खुपसणाऱ्या भामट्या डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुका आरोग्य विभागातील आरोग्य विस्तार अधिकारी सावंत यांनी सांगोला पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. पण पोलिसांनी अजूनही डॉक्टराला अटक केलेली नाही. तसा हा डॉक्टर या गावच्या रहिवाशीच झालेला आहे. आधार, रेशन कार्ड ही काढलेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुमारे ८ ते १० वर्षापासून कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना विनापरवाना, बेकायदेशीरपणे, वैद्यकीय व्यवसाय करुन रुग्णांच्या जिवीतास व आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या सांगोला तालुक्यातील नराळे येथील एका बोगस डॉक्टरचा भांडाफोड करीत आरोग्य पथकाने १३ मे रोजी कारवाई केली. वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी नसताना बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत होता. याबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मिलिंद संभाजी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबलू कुमार अधिकारी रा. नराळे, ता. सांगोला या बोगस डॉक्टरवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सांगोला तालुक्यातील बोगस डॉक्टर शोधून त्यांच्यावर प्रतिबंध करुन कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत सुरू आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सिमा दोडमनी , समिती सचिव बोगस डॉक्टर शोध मोहिम व विकास काळुंखे सहाय्यक गटविकास अधिकारी विकास काळूखे, विस्तार अधिकारी मिलिंद सावंत असे मिळुन घेरडी ता. सांगोला येथील आरोग्य केंद्रास भेट देण्यासाठी गेले. त्यानंतर घेरडी ता. सांगोला येथून येत असताना नराळे गावात बबलू कुमार अधिकारी हा बोगस डॉक्टर असून तो पेशंटकडून पैसे घेवून औषधे देतो अशी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांना याबाबत माहिती दिली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सायंकाळी ५ च्या सुमारास नराळे ता. सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या गाळ्यामध्ये आरोग्य विभागाच्यापथकाने छापा टाकला.
त्या ठिकाणी असलेल्या बबलू कुमार अधिकारी रा. नराळे ता. सांगोला याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने त्यांची शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केली. त्यावेळी बबलू कुमार याने दहावी नंतर आर. एम. पी. प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे दाखवून शिक्षण १० वी नंतर आर.एम.पी. केल्याचे सांगीतले.
आरोग्य विभागाच्या पथकाने बोगस डॉक्टर बबलू कुमार अधिकारी याच्याकडे उपलब्ध असलेली व साहित्य ताब्यात घेतले . कागदपत्राची पाहणी केली असता बोगस डॉ . अधिकारी यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी कोणतीही विहीत पदवी नसल्याचे दिसून आले.
वैद्यकीय पात्रता व विहीत नोंदणी नसताना वैद्यकीय व्यवसाय करुन जनतेच्या आरोग्यास व जिवीतास धोका करुन त्यांच्याकडून पैसे घेवून फसवणुक करीत असल्याचे दिसून आले. याबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मिलिंद संभाजी सावंत यांनी बोगस डॉक्टर बबलू कुमार अधिकारी रा. नराळे ता. सांगोला यांच्याविरुध्द सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
0 Comments