२७ वर्षानंतर धावणार १२ डब्याची पहिली ' डेमू '
सोलापूर : मागील अनेक वर्षापासून प्रतिक्षा असलेल्या अहमदनगर ते आष्टी या लोहमार्गावर येत्या ७ मे रोजी पहिली १२ डब्यांची डेमू (पॅसेंजर) धावणार असून, अहमदनगर ते आष्टी दरम्यान प्रवाशांना आता दररोज प्रवास करता येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्विटरद्वारे दिली.
नगर ते आष्टी हा एकूणा ६१ किलोमीटरचा मार्ग आहे. यादरम्यान मागील काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनांकडून ताशी १३० किलोमीटर वेगाने चाचणी घेण्यात आली होती. या मार्गावर एकूण पाच स्थानक आहेत.
रेल्वे स्थानक सर्व सुविधेसह प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे नगर ते आष्टी दरम्याने धावणाऱ्या मार्गावर डेमूचा रेक देखील सज्ज झाला आहे. मात्र बीड-परळी रेल्वे धावण्यासाठी आणखी प्रवाशांना मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे. अहमदनगर रेल्वे स्थानकापासून नारायणडोह, लोणा, सोलापूर वाडी, कडा, आष्टी अशी पाच स्टेशन आहेत.
यामार्गावर दिवसांतून एक वेळा नियमीत रेल्वे धावणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. दुष्काळी आणि अतिशय ग्रामीण भाग असलेल्या आष्टी भागात रेल्वे धावणार असल्याने शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, चाकरमानी यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने या भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी खासदार प्रितम मुंडे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, तसेच सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आष्टी-बीड-परळी या लोहमार्गावर ७४ लहान पुल, १७ स्टेशन इमारतीचे काम, २४ अंडर ब्रीज, ४७ मोठे पुलाचे काम अद्याप बाकी आहे. यादरम्यान बावी, हातोळा आणि वेताळवाडी या भागात भासंपादन झाले आहे.
ठळक बाबी...
अहमदनगर-बीड-परळी एकूण अंतर २६१ किमी
१९९५ मध्ये मिळाली होती मान्यता
१२ डब्यांची डेमू (पॅसेंजर) धावणार
५ स्थानके प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज
उद्योगधंद्यास मिळणार चालना


0 Comments