ज्युनिअर मि. युनिव्हर्स संकेत काळे तरुणांसाठी युथ आयकॉन परिवर्तन
फाऊंडेशन तर्फे इंटरनॅशनल बॉडीबिल्डर संकेत काळे यांचा सत्कार
सांगोला (प्रतिनिधी) :सध्याची तरुणाई नशेच्या अधीन होत चालली आहे. निसर्गाने दिलेल्या बहुमूल्य शरीराची काळजी घेण्याऐवजी त्याचा नाश करत आहोत.
सांगोल्यातील डोंगरगावचे सुपुत्र संकेत काळे यांनी शरीराचे महत्त्व काय आहे हे सर्वांना पटवून दिले आहे. त्यांना नुकताच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्युनिअर मिस्टर युनिव्हर्स हा किताब मिळाला आहे. इंडियन बॉडिबिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन यांच्या वतीने दि. १५ ते १७ एप्रिल २०२२ रोजी बालेवाडी, पुणे येथे आशिया खंडातील बाँडिबिल्डिंग क्रिडा क्षेत्रातील सगळ्यात मोठा क्रीडा महोत्सव आयोजीत केला होता.
त्यात पुणे विद्यापिठाचा विद्यार्थी नॅशनल चॅम्पीयन महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डर संकेत संजय काळे यांनी ज्युनिअर मिस्टर युनिव्हर्स सिल्वर मेडल (द्वितीय क्रमांक) मिळवून क्रीडा जगतामध्ये डोंगरगावचे आणि सांगोल्याचे नाव जगाच्या नकाशात उंचावण्याचे अतुलनिय काम केले आहे. या स्पर्धेत जगातील साठ (६०) देशातील बॉडीबिल्डर खेळाडूंचा सहभाग होता. त्यामध्ये संकेत यांनी सिल्वर मेडल मिळवल्यामुळे क्रीडा जगतातून आणि क्रीडाप्रेमीं कडून संकेत यांच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सदर सत्कार समारंभ शुक्रवार दि. २२ एप्रिल, २०२२ रोजी संकेत काळे यांच्या वासुद रोड, सांगोला येथील राहत्या घरी पार पडला. या समारंभासाठी परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प ओंकार साळुंखे, सचिव प संतोष महिमकर, सदस्य प. संदेश पलसे व प. संजय गव्हाणे हे उपस्थित होते. यावेळी संकेत काळे यांनी सर्व तरुणाईला मद्यपान, धुम्रपानाचा त्याग करून आरोग्याकडे लक्ष देऊन शरीर सुदृढ बनवावे असे आवाहन केले व समाजातील दानशूर व्यक्तींनी क्रीडा प्रकारातील प्रतिभावान खेळाडूंना आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन संस्थाध्यक्षांनी केले.


0 Comments