google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर - मिरज मार्गावर अपघात, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू !

Breaking News

पंढरपूर - मिरज मार्गावर अपघात, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू !

 पंढरपूर - मिरज मार्गावर अपघात, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू !

सांगोला : मिरज मार्गावर कार आणि बुलेट यांच्यात झालेल्या अपघातात सांगोला तालुक्यातील नाझरे येथील एक पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. 



रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून सांगोला ते मिरज दरम्यान अनेक मोठे अपघात झाले असून आता या रस्त्याचे किरकोळ काम उरलेले आहे. हा रस्ता सिमेंटचा आणि रुंद केल्याने वाहतुकीची चांगली सोय झाली असली तरी वाहनांचा वेग मात्र प्रचंड वाढला आहे आणि त्यातून अपघाताचे प्रमाण अधिकच वाढले आहे. सदर रस्ता अजून पूर्णपणे तयार झालेला नसल्याने अचानकच रस्ता बंद करून वळवलेला असल्याचे चालकाला दिसते आणि वाहनावर नियंत्रण आणता येत नाही. 


शिवाय रुंद आणि सिमेंटचा रस्ता असल्यामुळे वाहनांचा वेग एवढा प्रचंड असतो की अपघात होताच वाहनांची अवस्था काडीपेटीसारखी होत असल्याचे प्रत्येक अपघातात दिसू लागले आहे. आता पुन्हा एक अपघात याच मार्गावर झाला असून ४३ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा यात जागीच मृत्यू झाला आहे. कवठे महांकाळ हद्दीत हा अपघात झाला असून कार आणि बुलेट यांच्यात जोराची टक्कर होऊन ही घटना घडली आहे. रस्ता रुंद असताना आणि येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनांचे मार्ग वेगळे असताना देखील हा अपघात झाला.


 सांगोला तालुक्यातील नाझरे गावाचे प्रवीण सोनवणे हे आपल्या दुचाकीवरून मिरजकडे निघालेले होते तर समोरून येणार कार (एम एच ०१ एव्ही ५३५२) मिरजकडून सांगोल्याकडे येत होती. उत्तम सिमेंट कारखान्याजवळ ही वाहने आल्यानंतर तेथील पुलावर दोन्ही वाहने समोरासमोर वेगाने धडकली.या अपघातात कार एकदम उलटी झाली तर दुचाकी देखील बाजूला फेकली गेली.  यात दुचाकीवरील पोलीस कर्मचारी जागेवर ठार झाले तर कारचालक रविराज शिंदे यांच्यासह  तिघे जखमी झाले. 


सांगोल्यात हळहळ !

अलकूड हद्दीत झालेल्या या अपघातात मृत्युमुखी पडलेले पोलीस कर्मचारी प्रवीण बाबाराम सोनवणे हे सांगोला तालुक्यातील नाझरे येथील असून सांगली येथे नेमणुकीस होते. ते सुट्टी असल्याने आपल्या गावी आले होते आणि गावावरून परत सांगलीस नोकरीसाठी निघालेले होते. दरम्यान त्यांचा अपघाती मृत्यू ओढवला असून सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. 


डोक्याला मार !

बुलेटवरून सांगलीला निघालेल्या प्रवीण सोनवणे यांना या अपघातात जोराचा मार लागला. दोन्ही वाहने वेगात असताना झालेल्या या अपघातामुळे कार अक्षरश: उलटी झाली तर सोनवणे यांची दुचाकी बाजूला फेकली आणि त्यांच्या पायासह डोक्याला जोरदार मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य जखमींना कवठे महांकाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Post a Comment

0 Comments