महाविकास आघाडीत धुसपूस ! इच्छुकांचे पक्षांतर लांबणीवर
सोलापूर : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना व कॉंग्रेसमधील अनेक आजी-माजी पदाधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षांतर करणार आहेत.पण, सध्या महाविकास आघाडीतील विविध मुद्द्यांवरून नाराजीनाट्य सुरू झाले आहे. त्यामुळे इच्छुकांचे पक्षांतर तूर्तास थांबविण्यात आले आहेत.शिवसेनेने भाजपशी फारकत घेतल्यानंतर राष्ट्रवादी व कॉंग्रेसला सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार विराजमान झाले. त्यावेळी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर कॉंग्रेसने महाविकास आघाडीत सहभाग घेतला.
भाजपला रोखण्यासाठी वर्षानुवर्षे विरोधात लढलेल्या पक्षांना शिवसेनेने साथ दिली. पण, भाजपच्या माध्यमातून सातत्याने महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे, शिवसेना व कॉंग्रेसमधील काही नेत्यांना राष्ट्रवादीत घेतले जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी नाराजी व्यक्त करीत आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सोलापुरातील एका मेळाव्यात काही दिवसांपूर्वी हीच खंत बोलून दाखविली. तत्पूर्वी, शिवसेनेतील काही नेत्यांचाही तसाच सूर होता.
आता महाविकास आघाडीचे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामला बगल देत असल्याने कॉंग्रेसमधील ते आमदार नाराज झाल्याचे बोलले जात आहे. त्यात आमदार प्रणिती शिंदे यांचेही नाव असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज्य पातळीवरील या घटनांमुळे शिवसेना व कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असलेल्यांचे पक्षप्रवेश काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पण, कॉंग्रेसमधील दोन माजी महापौर आणि माजी शहराध्यक्षांसह त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर कॉंग्रेसने त्यासंबंधीची ओरड प्रदेशाध्यक्षांकडे केल्याचीही चर्चा आहे. तर शिवसेनेनेही त्यासंबंधीची माहिती यापूर्वीच पक्षाच्या सचिवांना दिली आहे. त्यामुळे सध्याच्या पक्षाची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचे स्पष्ट करून त्या पक्षातील नेत्यांसोबत गेलेल्यांची पंचाईत झाली आहे.इच्छुकांचा पक्षप्रवेश निश्चितपणे होईल
कॉंग्रेस अथवा शिवसेनेसह इतर पक्षांतील नाराज काही आजी-माजी पदाधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असून त्यांनी तशी भूमिका यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे त्यांना पक्षप्रवेश द्यावाच लागेल, अन्यथा ते विरोधकांना जाऊन मिळतील. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांत निश्चितपणे त्या इच्छुकांचा पक्षप्रवेश होईलच, अशी स्पष्ट भूमिका राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकाळशी बोलताना मांडलीप्रभागरचना अन् ऍडजेस्टमेंट पाहून पक्षांतर
सोलापूर शहरातील माजी महापौर तथा शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे व त्यांचे शिवसेनेतील समर्थक माजी नगरसेवक, वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिलेले माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, एमआयएममधून राष्ट्रवादीत जाण्यास इच्छुक तौफिक शेख व त्यांचे समर्थक माजी नगरसेवक यांच्यासह आणखी कॉंग्रेसमधील काहीजण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, महापालिकेची प्रभागरचना कशी होईल, आपल्याला त्या पक्षातून संधी मिळेल का, याची चाचपणी करूनच ते पक्ष बदलतील, असे बोलले जात आहे. स्वत:चा पक्ष कोणता असावा, हे स्वत:च ठरवणाऱ्या त्या नेत्यांना जनता स्वीकारणार का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
0 Comments