काहीजण पोलिसांना माफिया म्हणून त्यांची बदनामी करतात – उद्धव ठाकरे
समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी हे सरकार असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे. पोलिसांना राहण्यासाठी घरे, पोलीस ठाणे, सुविधा या प्रत्येक बाबतीत आपल्या सरकारने केवळ विचार न करता सकारात्मक कृती केली आहे.
काही जणांना चांगली कामे पाहवत नाहीत, म्हणूनच ते पोलिसांना माफिया वगैरे म्हणत त्यांची बदनामी करतात. असे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. शनिवारी पोलिसांच्या 112 हेल्पलाईन आणि CCPWC प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पोलिसच आपले रक्षक असल्याचे अनेक जण विसरून जातात. पण मला अगदी लहानपणापासूनच पोलिसांचा अभिमान आहे. पूर्वीच्या पोलिसांचा युनिफॉर्म वेगळा होता. त्यावेळी हाफ पॅण्ट असलेला निळा गणवेश आणि हातात दंडुका घेतलेल्या पोलिसाला आपण पाहायचो. आता काळ बदलला आहे, नवीन हत्यारे उपकरणे आली आहेत. त्यामुळे गुन्हेगाराच्या एक पाऊल पुढे जाऊन पोलिसांना विचार करण्याची गरज भासू लागली आहे.
पोलीसाचा धाक व दरारा वाटेल असे त्यांचे व्यक्तिमत्व असायलाच हवे. आपण अजूनही कसाबला विसरलेलो नाही. कोणाच्या ध्यानीमनी नसताना अतिरेकी किती विचारपूर्वक आणि शस्त्रसज्ज होऊन मुंबईत घुसले. पण तुकाराम ओंबाळे सारख्या शूर पोलीस हवालदाराने जीवाचे बलिदान दिले पण त्यापूर्वी त्या अतिरेक्याला रोखले.
0 Comments