सांगोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत शिवशक्ती-भीमशक्ती ऐक्याचे दर्शन..!
मिरवणुकीत छ. शिवरायांचा जयजयकार ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सांगोला : तालुका प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील सर्वात संवेदनशील तालुका म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुक्यात महापुरुषांच्या जयंती या नेहमीच या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरत असतात. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सांगोला शहरात काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत शिवशक्ती-भीमशक्ती ऐक्याचे दर्शन सबंध तालुक्याला पाहायला मिळाले.
मिरवणुकीत डीजेच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करून या तालावर सांगोला शहर आणि तालुक्यातील तरुणाई थिरकली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होऊ लागला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांनी तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून सर्वसामान्य नागरिकांना स्वातंत्र्याचा मोकळा श्वास मिळवा म्हणून हयातभर प्रयत्न केले. परंतु प्रत्येक महापुरुषाला जातीय चौकटीत अडकविल्याने सांगोला शहर व तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीत गेल्या काही वर्षांपूर्वी किरकोळ चकमकी घडल्याने दोन वर्षानंतर प्रथमच होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती मिरवणूकीकडे सबंध पोलीस प्रशासन आणि तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ तसेच शहर व तालुक्यातील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते यांनी महापुरुषांनी घालून दिलेल्या विचारांचे तंतोतंत पालन करून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली. व शहरातील नेहरू चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शोभायात्रा आल्यानंतर डीजेच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार सुरू केला. यानंतर या परिसरात असलेल्या तरुणांनी उस्फूर्तपणे मिरवणुकीत सहभागी होऊन शिवशक्ती-भीमशक्ती ऐक्याचे दर्शन घडविले.
• व्हायरल व्हिडीओवर होतेय चर्चा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयतींच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये शहरातील नेहरू चौक येथे शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्यानंतर सर्वच समाजातील तरुण डीजेच्या तालावर एकत्रित नाचताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याची चर्चा शहर व तालुकाभर होऊ लागली. महापुरुषांचा विचारांचा वारसा घेऊन सर्व समाजातील तरुणांनी असेच एकत्रित राहिल्यावर समाजातील वाद आपोआपच मिटतील व सर्वजण एकविचाराने राहिल्याने कायदा सुव्यवस्थाही अबाधित राहील.
0 Comments