google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर झेडपीच्या 'स्वामीं'वर आता 'माझी जिल्हा परिषद, माझी जबाबदारी' ; 'मी जबाबदार, माझा अधिकारी राहणार आता जबाबदार'

Breaking News

सोलापूर झेडपीच्या 'स्वामीं'वर आता 'माझी जिल्हा परिषद, माझी जबाबदारी' ; 'मी जबाबदार, माझा अधिकारी राहणार आता जबाबदार'

 सोलापूर झेडपीच्या 'स्वामीं'वर आता 'माझी जिल्हा परिषद, माझी जबाबदारी' ;

'मी जबाबदार, माझा अधिकारी राहणार आता जबाबदार' 


सोलापूर : अनेक वर्षानंतर राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रशासक केवळ दोन-चार महिने नाही तर तब्बल सहा महिन्यापर्यंत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी मोकळीक राहणार आहे, कोणत्याही लोकप्रतिनिधींचा अडथळा आणि अडचण आता जाणवणार नाही.


सोलापूर जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे प्रशासक पद आले आहे. 20 मार्च 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे 21 मार्च पासून प्रशासकीय कारकीर्द सुरू होईल. पाच वर्ष जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी आणि सदस्यांचे नियंत्रण प्रशासनाच्या कामकाजावर होते आता जिल्ह्याचा विकास करण्याची मोठी संधी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे चालून आली आहे.


नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये बार्शीचे सदस्य मदन दराडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी माझी जिल्हा परिषद, माझी जबाबदारी अशा पद्धतीने पुढील काळात काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या अपेक्षेवर बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी आपल्या आजपर्यंतच्या 15 महिन्याच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा सेस फंड किती कोटींनी वाढवला याची माहिती तर दिलीच मात्र माझी जिल्हा परिषद, माझी जबाबदारी या पद्धतीने जर कामाची अपेक्षा असेल तर राजकीय हस्तक्षेप नको अशी थेट भूमिका त्यांनी सभागृहात मांडली होती.


राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याला 500 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेला निधी मिळण्याची शक्यता आहे, येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये प्रशासक असल्याने निधी खर्च व्यवस्थित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु जिल्हा परिषदेमध्ये अनेक वादग्रस्त अधिकारी आहेत. मागील वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन कारवाया जिल्हा परिषदेमध्ये झाल्या आहेत. यावरून जिल्हा परिषद किती भ्रष्ट झाली याचा प्रत्यय आला. शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण ,बांधकाम, जलसंधारण, ग्रामपंचायत, सामान्य


 प्रशासन, महिला बालकल्याण, पशुसंवर्धन या विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. लक्ष्मी दर्शनाशिवाय कोणतेही काम होत नाही असा आरोपही जिल्हा परिषदेमध्ये कायम होत आलेला आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या नियुक्तीवरून सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्या नियुक्त्यासुद्धा वादग्रस्त ठरण्याची शक्यता पुढील काळात वर्तवली जाते.


अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच टेबलावर चिकटले आहेत. त्यामुळे प्रशासक दिलीप स्वामी यांना या सर्व गोष्टीवर लक्ष व इतर बाबींवर नियंत्रण ठेवावे लागेल ज्या पद्धतीने माझी जिल्हा परिषद, माझी जबाबदारी या भूमिकेतून ते काम करतील त्याच पद्धतीने मी जबाबदार, माझा अधिकारी जबाबदार अशा भूमिकेतून त्यांनी पुढील कामकाज पहावे अशी अपेक्षा सोलापूरकर ठेऊन आहेत.

Post a Comment

0 Comments