सोनंदमधील ३३ के. व्ही. उपकेंद्र जळाले
सांगोला महावितरणचे अभियंता आनंद पवार यांच्याबाबत तालुक्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहेत. ते कोणालाही भेटीसाठी वेळ देत नाहीत. जर भेट झाली तर पोकळ आश्वासने देऊन मार्गी लावले जाते. तालुक्यातील शेकडो शेतीपंप वीज जोडण्या रखडल्या आहेत. सर्वसामान्यांचे सोडा राजकीय पक्षांचे नेते, पत्रकार यांचेही ते फोन उचलत नाहीत. जणू ते या सर्वांना फाट्यावर मारतात.
सांगोला तालुक्यातील सोनंद येथील ३३ के. व्ही. उपकेंद्र जळाल्याने गेल्या 16 दिवसांपासून वीज पुरवठा बंद आहे. याकडे महावितरणचे सांगोल्यातील उपकार्यकारी अभियंता आनंद पवार हे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
या ३३ के.व्ही उपकेंद्रावर सोनंद गाव व गावठाण, गळवेवाडी, पवार वस्ती डोंगरगांव हा भाग येतो. परंतु गेल्या 16 दिवसांपासून हा भाग मानेगांव व जवळा उपकेंद्रावर जोडला आहे. या सोनंद उपकेंद्रावर २२५ गावठाण डीपी व शेतकरी डिपी आहेत.या गावांनी प्रत्येक डीपीवर ५० हजार रुपयांप्रमाणे महावितरणला वसुलीसाठी मदत केली आहे. परंतु महावितरणच्या असहकार्यामुळे सोनंद, पवार वस्ती, गळवेवाडी, डोंगरगांव गावातील उभी पिके, फळ बागा, पालेभाज्या भर उन्हाळ्यामुळे जळून खाक झाल्या आहेत.
तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारासमोर दोन गायींपासून ते पाच गायी, दहा गायी, वीस गायी, पन्नास गायी पर्यंत संकरित गायी असलेला भाग आहे. परंतु पाणी नसल्याने जनावरांना पिण्यासाठी व धुण्यासाठी त्यांचे हाल होत आहेत. वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
जवळा व मानेगांव उपकेंद्रावरून जोडलेला वीज पुरवठा दहा मिनिटे देखील राहत नाही. त्यामुळे मोटारीजवळ घरातील एका व्यक्तीला बसण्याची सजा मिळत आहे. तरीही पिकांना पाणी, पाणी वाफ्यात जात नाही, हौद भरण्यासाठी पाणी मिळत नाही. या सर्व तक्रारी करून गावपुढाऱ्यांची दमछाक झाली आहे. तसेच सत्तेतील आजी माजी आमदारांनी या प्रकरणाकडे सोईस्करपणे पाठ फिरवली आहे.
याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची ग्रामस्थांनी विजेच्या प्रश्नांबाबत भेट घेऊन तक्रार केली आहे. देशमुख यांनी सांगोला महावितरणचे उपअभियंता आनंद पवार, विभागीय अभियंता संजय गवळी पंढरपूर, अधिक्षक अभियंता सोलापूर संतोष सांगळे यांना संपर्क साधून या गावांच्या ३३ के.व्ही.चा विद्युत पुरवठा शुक्रवारपर्यंतसुरळीत न केल्यास सांगोला – जत हायवेवर सोनंद गावाशेजारी जनावरांसह बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सदर आशयाचे निवेदन तहसीलदार अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना ई-मेल द्वारे पाठवले आहे.
आनंद पवारांची उचलबांगडी करणार
सांगोला तालुक्यात महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार हे अकार्यक्षम आहेत. कोणालाही भेटीसाठी वेळ देत नाही. जर भेटला तर थातुर उत्तरे देवून तालुक्यातील जनतेला त्रास देत आहेत. तालुक्यातील शेकडो शेतीपंप वीज जोडण्या रखडल्या आहेत. अवाच्या सव्वा वीजबिले, डीपी जळल्यानंतर पैसे उकळणे हा महावितरणचा धंदा बनला आहे. तालुक्यातील जनतेला हा अधिकारी त्रासदायक ठरीत आहे. सर्वच पक्षातील नेत्यांच्या त्यांच्याबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्याची गडचिरोलीला बदली करण्याचा निश्चय भाजपचे जिल्हाध्यक्षक श्रीकांत देशमुख यांनी बोलून दाखविला.
9 मार्चपासून सबस्टेशन बंद
सोनंद येथील 33 केव्ही सबस्टेशन 9 मार्च 2022 पासून जळालेले आहे.आज जरी गावभागातील विद्युत पुरवठा सुरू असला तरी शेतीपंपाचा विद्युत पुरवठा बंदच आहे. त्यामुळे बळीराजासह पशूपालकांचे मोठे हाल होत आहे. येथील लोकांना पिण्यास पाणीही मिळत नाही. त्यामुळे, यासबस्टेशन अंतर्गत 225 डीपी मागील 16 दिवसापासून बंद आहेत.
सोनंद गावातील शेती पंपाचा विद्युत पुरवठा 9 मार्च 2022 पासून बंद आहे. त्यामुळे आम्हा शेतकरी बांधवांचे अतोनात हाल होत आहे. पिकाना सोडा जनावरांना, माणसांना पिण्यास पाणी नाही. महावितरणचे अधिकारी कोणीही आमची तक्रार ऐकून घेत नाहीत. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी आता उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत. – नितीन कांबळे,शेतकरी सोनंद
नुकसानीचा दावा ठोकणार
सोनंद व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या 16 दिवसात झाले आहे. त्याचबरोबर दहावी-बारावीच्या परीक्षाही सुरू आहेत. विशेषतः विद्यार्द्यांचे मोठे शैक्षणिक नुकसानही झाले आहे. याला जबाबदार कोण? अशा या महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या विरोधात ग्राहक मंचात दावाही ठोकणार असल्याचे श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.
महावितरणचे बोट ठेकेदाराकडे
सांगोला तालुक्यात महावितरण विभागात आनंदी आनंद आहे. तालुक्यात जनतेला अंधारात ठेवण्यात त्यांना भारी वाटते. सोनंद येथे नव्यानेच सबस्टेशन झाले आहे. 9 मार्च रोजी डीपी जळला आहे. पण ती जबाबदारी ठेकेदाराची आहे, असे महावितरण सांगते मग हे अधिकारी काय करतात? ठेकेदाराला कोण कामे देतो? मलई कोण खातो? त्यांना 16-16 दिवस गावे अंधारात ठेवणे कसे योग्य वाटते. येथे उपकार्यकारी अभियंता जबाबदार असल्याचे अनेकजण सांगत आहेत.


0 Comments