जूनपर्यंत शेतीसाठी दोन आवर्तने देण्याचा निर्णय
पुणे : नीरा उजवा आणि डावा कालव्यातून ३० जूनपर्यत दोन आवर्तने देण्याचा महत्वाचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला असून या निर्णयामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा लाभला आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून पिकासाठी अधिक पाण्याची गरज भासू लागली असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. नीरा उजवा आणि डाव्या कालव्यातून ३० जूनपर्यंत शेतीसाठी दोन आवर्तने देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. बारामती, इंदापूर, फलटण, खंडाळा, पंढरपूर, माळशिरस या परिसरातील शेतकरी बांधवांची ऐन उन्हाळ्यातील पाण्याची गरज यामुळे पूर्ण होणार आहे.
मागील वर्षी चांगला पाउस झाल्याने पुणे जिल्ह्यातील नीरा देवधर, भाटघर, वीर, गुंजवणी या धरणात मिळून ३५. ५३ टीएमसी पाणी साठा आहे. या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही हे आधीपासूनच स्पष्ट आहे. नीरा उजवा आणि डाव्या कालव्यातून सद्या पाणी सोडलेले आहेच पण याला जोडूनच आणखी एक आवर्तन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे. ३० जून पर्यंत शेतीसाठी सलग दोन आवर्तने दिली जाणार असल्याने उन्हाळ्यात शेतकरी बांधवास मोठा दिलासा लाभला आहे.
नीरा उजवा कालव्यातून पंढरपूर, माळशिरस तालुक्याच्या लाभक्षेत्रासाठी मंजूर कोट्याप्रमाणे पाणी दिले जाणार असून यावेळी पावसास विलंब झाला तर ३० जूनच्या नंतरही पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा आदेश दिला आहे.
सदर बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार राम सातपुते, समाधान आवताडे, अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील शेळके, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नीरा उजवा कालव्यातून पंढरपूर, माळशिरस तालुक्याच्या लाभक्षेत्रासाठी मंजूर कोट्याप्रमाणे पाणी दिले जाणार असून यावेळी पावसास विलंब झाला तर ३० जूनच्या नंतरही पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


0 Comments