तरुण ऊस तोडणी मजुराचा टोळीच्या मालकाकडून खून !
इंदापूर : तालुक्यातील भरणेवाडी येथे ऊसाची तोडणी करणाऱ्या मजुराचा खून झाला असून मजुराच्या टोळीचा मालक अमोल माने याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला की परजिल्ह्यातून उस तोडणी कामगारांच्या टोळ्या पश्चिम महाराष्ट्रात दाखल होतात. अनेक अडचणी आणि विविध संकटाना सामोरे जात हे कामगार कष्ट करत असतात. अनेक धोके पत्करून हे मजूर गाळप हंगाम संपेपर्यंत काम करीत असतात. सद्या हंगाम संपत आल्याने मजुरांच्या अनेक टोळ्या परतल्या आहेत तर काही टोळ्या अजूनही ऊसाच्या तोडणीचे काम करीत आहेत. अशाच एका मजुराची हत्या झाली असल्याने खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील बरकतपूर ( ता. कन्नड ) येथील ३० वर्षाच्या गणेश मधुकर लोखंडे या ऊस तोड मजुराचा टोळी मालकाकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मजूर गणेश हा व्यसन करतो आणि वेळेवर तोडणी करीत नाही या कारणावरून ऊस वाहतूकदार मालकाने त्याला जबर मारहाण केली. टोळीमालक अमोल हनुमंत माने (कात्रज, ता. करमाळा) याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून मयत गणेश लोखंडे याची पत्नी अलका लोखंडे यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी गावाच्या शिवारात उसाची तोडणी सुरु आहे. येथे टोळीमालक माने याने मजूर गणेश लोखंडे याला ऊसाने मारहाण केली. गणेश हा व्यसनाच्या आहारी गेला आहे आणि ऊसाची तोडणी व्यवस्थित करीत नाही असे म्हणत माने याने गणेशला मारहाण केली. या मारहाणीत गणेश गंभीर जखमी झाला. त्याला जबर मार लागल्याने त्यास लासुर्णे येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
टोळीमालक अमोल हनुमंत माने यास वालचंदनगर पोलिसांनी अटक केली असून या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. गणेश लोखंडे आणि त्याची पत्नी अलका लोखंडे हे दोघेही माने याच्या टोळीत उसाची तोड करण्याचे कामं करीत होते, माने याने केलेल्या मारहाणीत गणेश याच्या पोटात आणि पाठीत जोराचा मार लागला होता. त्याच्या पत्नीने त्याला कोपीत नेले.
गणेशला त्रास होत होता आणि या घटनेमुळे पती पत्नी उपाशीच झोपले. गणेशचा त्रास वाढत गेला. गणेश झोपी गेला असे पत्नीला वाटले पण नंतर त्याची कसलीच हालचाल होत नसल्याचे पाहून पत्नीला शंका आली. त्यानंतर त्याने अमोल माने आणि गणेशाचा मामा वाल्मिक गायकवाड यांना बोलावून घेतले. त्यानंतर दवाखान्यात नेले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले.


0 Comments