एसटीत ११ हजार कंत्राटी चालकभरती नियुक्तीसाठी आठवड्यात निविदा प्रक्रिया
राज्यभरात एसटीचा संप आजही कायम आहे. अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये वाहकांबरोबरच चालकांचीही संख्या मोठी असल्याने वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीतच आहे. परिणामी राज्यातील एसटी वाहतूक सुरळीत करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून एसटी महामंडळाने ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास पाच महिने राज्यात एसटीचा संप सुरू आहे.
विविध प्रयत्न करूनही संप मिटत नसल्याने एसटीत यापूर्वी एक हजार ७५० कंत्राटी चालकांची भरती करण्यात आली आहे. यानंतर आणखी ११ हजार चालकांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती पूर्ण झाल्यानंतर सध्या चालक आणि वाहक अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांनी पूर्णपणे वाहकाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, चालकांची भरती करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या नियुक्तीसाठी येत्या आठवड्यात निविदा काढण्यात येणार असून, त्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांत टप्प्याटप्प्याने कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
0 Comments