google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : डिजिटल सभासद नोंदणी महागाईविरोधात की पक्षासाठी ?

Breaking News

सोलापूर : डिजिटल सभासद नोंदणी महागाईविरोधात की पक्षासाठी ?

 सोलापूर : डिजिटल सभासद नोंदणी महागाईविरोधात की पक्षासाठी ?

सोलापूर: शहर कॉंग्रेसच्या वतीने डिजिटल सभासद नोंदणीवर सातत्याने जोर दिला जात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सभासद नोंदणीत सोलापूर शहर राज्यात अव्वल असायला हवे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली आहे.त्यानुसार सातत्याने आढावा घेतला जातोय. 


आमदार प्रणिती शिंदे यांनीही शुक्रवारी कॉंग्रेस भवानात बैठक घेऊन मोदी सरकारची खोटी आश्‍वासने आणि वाढत्या महागाईविरोधात सर्वाधिक सभासद नोंदणी व्हावी, असे आवाहन केले. पण, प्रदेशाध्यक्षांनी दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी की खरोखरच महागाई विरोधात लढण्यासाठी सभासद नोंदणी केली जातेय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.


कॉंग्रेसने ७० वर्षांत देशात रेल्वे, एअरपोर्ट, धरणे, कालवे, पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑईल, वस्त्रनिर्मिती असे अनेक उद्योग निर्माण केले. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. पण, २०१४ नंतर जनतेला खोटी आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकार सर्व सरकारी कंपन्या विकत आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. मोदी सरकार पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ करीत आहे. 


एकीकडे लोकांचे उत्पन्न घटत असताना दुसरीकडे महागाई मात्र वाढत आहे. पण, मोदी सरकार जाती-धर्माच्या विषयात देशाला गुरफटून ठेवत असल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला. दरम्यान, देशाच्या व सर्वसामान्यांच्या हितासाठी महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसची ताकद वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले.


कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, माजी नगरसेविका अनुराधा काटकर, फिरदोस पटेल, परवीन इनामदार, प्रदेश सचिव अलका राठोड, ॲड. मनीष गडदे, नरसिंह आसादे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, उदयशंकर चाकोते, बाबूराव म्हेत्रे, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, युवकाध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, युवकचे प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव आदी पदाधिकारी यांच्यावर शहरातील सभासद नोदणीची संपूर्ण धुरा सोपविली आहे.


...त्यांनाच महापालिकेत उमेदवारी

कॉंग्रेसच्या वतीने सुरु असलेली डिजिटल सभासद नोंदणीची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. जे पदाधिकारी जास्त सभासद नोंदणी करतील, त्यांनाच आगामी महापालिकेत उमेदवारी मिळेल. तसेच त्यांना पक्षात सन्मानजनक पद देण्यासाठी विचार होईल, असेही आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments