निवडणुकांसाठी पाण्याचा मुद्दा ठेवणार नाही आमदार पाटील : सांगोला तालुक्यातील सर्व योजना पूर्णत्वाकडे
सांगोला , ता . २८ : सांगोल्यातील कोणतीही निवडणूक असो त्या निवडणुकीत पाणीप्रश्न आजपर्यंत कळीचा मुद्दा ठरत होता . परंतु यापुढील तालुक्यातील कोणत्याही निवडणुकीत पाण्याचा मुद्दा नसणार आहे . सध्या तालुक्यातील सर्वच अपूर्ण पाणी योजना पूर्णत्वाकडे येत आहे . तालुक्यातील प्रत्येक गावास पाणी मिळणार आहे . यापुढे विरोधकांनाही निवडणुकीत पाणी मुद्दा नसणार ही एक मोठी संधी देणार असल्याचे मत आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले .
तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत आमदार शहाजी पाटील ' सकाळ'शी बोलत होते . ते म्हणाले , सांगोला तालुक्यात गेली अनेक वर्षे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपासून आमदार - खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत अपूर्ण पाणी योजना , त्यासाठी मेळावे , संघर्ष यात्रा , पाणी परिषेदा असेच मुद्दे घेऊन निवडणुकीतप्रसार प्रचार , केला जात होता .
त्यामुळे निवडणूक कोणतीही असली तरी ' पाणी ' हा मुद्दा कळीचा ठरत होता . परंतु , गेल्या अनेक वर्षापासून निधीअभावी रखडलेल्या पाणी योजना मार्गी लागत आहेत . टेंभू , म्हैसाळ , नीरा - उजवा कालवा यासह इतर योजना मार्गी लागणार आहेत . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपूर्ण पाणी योजनेसाठी भरपूर निधीची तरतूद केली आहे .
पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत तालुक्यातील अपूर्ण एकही पाणी योजना राहणार नाही . त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गाव कोणत्या तरी योजनेखाली जोडले जाणार असून पाणी योजनेपासून एकही गाव वंचित राहणार नाही . त्यामुळे यापुढील तालुक्यातील निवडणुकीत पाण्याचा मुद्दा नसणार असल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी ठणकावून सांगितले .
चौकट
संघर्षाशिवाय पाणी या अगोदर तालुक्यातील जनतेने पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे . परंतु यापुढे जनसामान्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही . तालुक्यातील सर्वच पाणी योजना नियोजनबद्ध व व्यवस्थित सुरु राहतील , याची मी खात्री देतो , असेही आमदार पाटील यांनी सांगितले . नीरा उजवा कालव्यासाठी ६४.१२ कोटी नीरा उजवा कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन कामाच्या ६४.१२ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत . त्यामुळे नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून नियोजनानुसार तालुक्याला पाणी मिळणार आहे .

0 Comments