google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : मालट्रकने जोरदार धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार

Breaking News

सोलापूर : मालट्रकने जोरदार धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार

 सोलापूर : मालट्रकने जोरदार धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार

टेंभुर्णी : पुणे सोलापूर महामार्गावर टेंभुर्णीतील हाॅटेल जगदंबमध्ये जेवण झाल्यानंतर समोर उभ्या दोन महिलांना पुण्याकडून भरधाव वेगाने आलेल्या मालट्रकने जोरदार धडक देऊन चिरडले.त्यामुळे दोन्ही महिला गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या.


या मालट्रकने हाॅटेल समोर उभ्या असलेल्या एक मोटार सायकल व तीन कारला धडक देऊन त्यांचे नुकसान केले. हा अपघात बुधवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातामध्ये जयश्री चंद्रकांत वरपे ( वय-55 ), शांताबाई विठ्ठल चौरे ( वय- 75 दोघीही रा. कोंडी ता उत्तर सोलापूर) या ठार झाल्या.


याविषयी पोलीसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, जयंत पोपट साठे ( वय- 39 रा. बिबी दारफळ ता. उत्तर सोलापूर) हे भाचा नवनाथ नागनाथ माने व सागर यादव तसेच नवनाथ माने याची मावशी जयश्री चंद्रकांत वरपे व त्याची आजी शांताबाई विठ्ठल चौरे असे सर्वजण सोमवारी स्कॉर्पिओ (एम एच 15 / ए जे 0100) मधून मुंबई येथे नवनाथ याचे पाहुणे आजारी असल्याने भेटण्यासाठी गेले होते. पाहुण्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर बुधवारी दुपारी दोन वाजता हे सर्वजण स्कॉर्पिओमधून सोलापूरला जाण्यासाठी परत निघाले.


रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर टेंभुर्णी हद्दीतील हाॅटेल जगदंब समोर गाडी लाऊन जेवणासाठी हाॅटेलमध्ये गेले. जेवण झाल्यानंतर जयश्री वरपे व शांताबाई चौरे या दोघी महिला गाडी जवळ जाऊन थांबल्या होत्या. त्यावेळी पुण्याकडून भरधाव वेगाने आलेली मालट्रक ( एम एच 11 / 8300 ) ने या दोघींना जोरदार धडक दिली.


मालट्रक अंगावरून गेल्याने दोघी जागीच ठार झाल्या. या मालट्रकने हाॅटेल समोर उभी असलेली मोटारसायकल ( एम एच 45 / ए के 5274 ), इको स्पोर्ट कार ( एम एच 13/ डी ई 5256), कार (एम एच 13/ सीयू 6502), कार (एम एच 45/ 8146) या गाड्यांना धडक देऊन त्यांचे नुकसान केले. या अपघाताची माहिती समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक धनाजी ओमासे, सहाय्यक पोलीस फौजदार अभिमान गुटाळ, हवालदार मकबुल तांबोळी, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद काटे हे तातडीने घटनास्थळी आले.


या अपघात प्रकरणी जयंत साठे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून मालट्रक चालक संदीपान नवनाथ जगताप ( वय- 42 रा. गौरगाव ता. कळंब जि. उस्मानाबाद) यास पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी ओमासे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments