याद राखा, एक थेंब ही विषारी ताडी विकू देणार नाही ; राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर जोरदार निदर्शने, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
सोलापूर:-सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ताडी विक्रीस अधिकृत परवाना दिल्याचे सांगत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक विषारी ताडी विक्री केंद्र रोखण्यास चालढकल करत आहेत. कॉ.गोदुताई परुळेकर नगर कुंभारी लगत असणाऱ्या ७० हजार नागरी वसाहतीस विषारी ताडी विक्री केंद्राचा अतोनात त्रास होणार आहे. या विषारी ताडीमुळे आजमितीस हजारो कुटुंब उध्वस्त झालेले आहेत. व्यसनाधीन तरुणांमुळे ऐन तारुण्यात महिलांना वैधव्य मिळाले, निरागस मुले पोरकी झाली, कुटुंब विस्थापित होऊन शिक्षण व आरोग्य सुविधांपासून वंचित झाले.
हि वस्तुस्थिती लक्षात घेऊन ज्या ठिकाणी ताडी विक्री केंद्रास स्थानिक लोकांचा प्रखर विरोध आहे. त्या ठिकाणी ताडी विक्री केंद्र बंद करा, याद राखा एक थेंब ही विषारी ताडी विकल्यास उग्र आंदोलन करणार असा इशारा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय येथे विषारी ताडी विरुद्ध कॉ. गोदुताई परुळेकर संस्थेच्या वतीने आक्रमक निदर्शने करताना दिले.
सोमवार दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी कॉ.गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने विषारी ताडी विक्री केंद्र बंद करा व परवानगी रद्द करा हि प्रमुख मागणी घेऊन सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय येथे महिलांचे आक्रमक निदर्शने पार पडले.
यावेळी सोलापूर विभाग राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांना कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या नेतृत्वाखाली सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, उमा मागनुर, रत्नाबाई सुर्रे, संगीता एडके, निलोफर शेख, आरीफा शेख, युसुफ शेख (मेजर) आदींच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हंटले आहे कि, मौजे कुंभारी ता.द.सोलापूर येथील वळसंग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ७० हजार महिला विडी कामगारांची कॉ. गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार वसाहत हे संपूर्णपणे महिला सभासदांची असुन या महिलांना मा.केंद्र शासनाने व राज्य शासनाने अनुदान देऊन त्यांचा राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न केले आहे. या वसाहतीत सद्या अवैध धंद्याने थैमान घातलेले असुन वसाहतीत जिकडे पहावे तिकडे मटक्याचे अड्डे, जुगार अड्डे, दारुचे धंदे निर्माण झाले असुन या अवैध धंद्यामुळे महिलांच्या संसाराची वाताहात होत
असुन या सर्व प्रकाराला पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार आळा व प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न नेहमी चालु असुन त्यातच कुंभारी या गावाच्या परिसरात ताडी विक्री केंद्रास परवानगी देण्यात आली आहे असे आम्हांला कळाले आहे. तरी सद्या अस्तित्वात असलेल्या अवैध धंद्यामुळे महिलांना अपमानास्पद वागणुक मिळत असुन व काही अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून महिलांना लज्यास्पद वाटेल असे ही कृत्य याठिकाणी घडत आहे.
त्यातच याठिकाणी ताडी विक्री केंद्रास परवानगी देण्यात आली असून त्यामुळे या परिसरातील पुरुष मंडळी अधिक व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यांच्या कुटूंबाची वाताहात होण्याची शक्यता हि नाकारता येणार नाही. कांही अंतरावरच प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. त्यामुळे या परिसरातील विशेषत: महिलांमध्ये याबाबत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सबब आपणांस या निवेदनाद्वारे विनंती कि, वळसंग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे कुंभारी येथील विडी कामगार वसाहतीच्या परिसर व परिसरालगत ताडी विक्री केंद्रास दिलेली परवानगी रद्द करण्यात यावे. अन्यथा या परिसरातील महिलांच्या वतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनाची जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी.
यावेळी विल्यम ससाणे, अनिल वासम, वसिम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, बापू साबळे, फातिमा बेग, हसन शेख, मुरलीधर सुंचू, नरेश गुल्लापल्ली, डेव्हिड शेट्टी, कुर्मेश म्हेत्रे, अंजप्पा म्हेत्रे, सुरेश गुजरे, बालाजी तुम्मा, नागनाथ जल्ला, देवपुत्र सायाबोळू, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, महिबूब गिरगावकर, मधुकर चिल्लाळ, राहुल बुगले, बालाजी म्हेत्रे, गोविंद सज्जन, शहाबुद्दीन शेख, बाबू कोकणे, दत्ता चव्हाण आदींनी सक्रीय सहभाग नोंदविले.

0 Comments